उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबरच वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. डबल ट्रॉलीद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. डबल ट्रॉली वाहतूक जीवघेणी ठरत असून यापूर्वी अशा वाहतुकीमुळे अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा हंगाम सुरू होण्यापूर्वीच अनेक संघटनांनी वाहतूक शाखेबरोबर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे डबल ट्रॉली वाहतूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही. त्यांनी या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
मागील महिन्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाला असून शहरातून तसेच शहराबाहेरुन जाणार्या प्रत्येक रस्त्यावरुन डबल ट्रॉलीद्वारे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरु आहे. त्यातच प्रत्येक रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असल्याने ट्रॉली पलटण्याची भीती असते. त्यामुळे वाहनधारकांना अशा प्रकारच्या वाहनांना ओव्हरटेक करताना जीव मुठीत धरुन आपले वाहन चालवावे लागते. मागील वर्षी अशा प्रकारे ओव्हरटेक करताना अनेक अपघात घडले आहेत. त्यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
शहरातून जाणार्या श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावरुन अशा प्रकारची अनेक बेकायदा वाहने ऊस वाहतूक करतात. वहातुकीचे नियम न पाळता अपघातास कारणीभूत ठरणार्या अशा बेकायदा वाहनांनवर परिवहन कार्यालयाने व वाहतूक शाखेने कडक कारवाई करुन निरपराधांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी यापूर्वी अनेकांनी केली आहे. मात्र याबाबत कुठलीच दखल घेण्यात आलेली नाही.
श्रीरामपूर शहर व परिसरातून थेट अकोल्यापर्यंत ट्रक, डबल ट्रॉली ट्रॅक्टर, जुगाड ट्रॅक्टर आदी वाहनातून ऊस वाहतूक होत असते. या वाहनांना रिफलेक्टर, इंडीकेटर नसणे, ऊस वाहतूक परवाना नसने, चालक प्रशिक्षित नसणे, नादुरुस्त वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त लावणे या व इतर कारणांमुळे अपघात घडल्याचे अपघातानंतर निदर्शनास आलेले आहे. एवढे असताना मात्र, वाहतूक शाखेबरोबर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी कारवाई करावी
उत्तर नगर जिल्ह्यामध्ये आठ ते नऊ सहकारी कारखान्यांबरोबर काही खाजगी साखर कारखाने आहेत. त्यांना प्रत्येक भागातून ऊसपुरवठा होतो. त्यामुळे डबल ट्रॉलीद्वारे ऊस वाहतूक करण्याची जणू काही स्पर्धाच सुरु असल्याचे निदर्शनास येते. अशा वाहनांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी अशा प्रकारच्या बेकायदा ऊस वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.