अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2024- 25 चा साखर हंगाम अगदी सुरुवातीपासूनच ऊस उपलब्धता आणि अपेक्षीत साखर उत्पादनाच्या सतत बदलत गेलेल्या आकडेवारीच्या गर्तेत अडकलेला होता. साखर उत्पादनाची संभ्रमावस्था आजअखेर देखील टिकून आहे. यंदाच्या गोड उसाचा कडवट हंगामाच्या पार्श्वभूमीवर येणार्या ऑक्टोबरपासून सुरु होणार्या नव्या साखर हंगामाबाबत आशावाद आहे. दरम्यान, 2024 मधील समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे उसाच्या नव्या लागवडी मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. राज्यातील तसेच प्रमुख जलाशयातील समाधानकारक पाण्याच्या साठ्यांमुळे यंदा तुटला गेलेला उसाचा खोडवा पुढील गाळप हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध होणार असल्याने पुढील गाळप हंगामासाठी साखर उद्योग आशावादी आहे.
राष्ट्रीय पातळीवरील साखर कारखाना संघटनेने 333 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज केंद्र शासनाला सादर केला होता. त्यावर आधारित केंद्र शासनाने धोरण आखले. यात 20 लाख टन साखर निर्यातीच्या मागणीनुसार पहिल्या टप्प्यातील दहा लाख टन साखर निर्यातीला 20 जानेवारी 2025 रोजी परवानगी दिली. या निर्णयाचा बाजारातील साखर दर सुधारण्यास मदत झाली. त्यानंतर मात्र, मूळच्या साखर उत्पादन अंदाजात झपाट्याने बदल होत गेले. वास्तविक हंगाम सुरू होण्यापूर्वीपासूनच देशातील 80 टक्के साखर उत्पादन होणार्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यातील उभ्या उसाची अवस्था आणि त्यातून होणार्या अपेक्षित घटत्या साखर साखर उत्पादनाची आकडेवारी सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी व्यक्त केली होती.
उत्तर प्रदेशातील बहुसंख्य ऊस क्षेत्र व्यापलेल्या को-0238 या उसावर रेड रॉटआणि टॉप शूट बोररचे आक्रमण झालेले आणि त्याचवेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उभ्या उसावर आलेला अकाली फुलोरा व त्यामुळे खुंटलेली वाढ व साखर उतार्यावरील प्रतिकूल परिणाम या सर्व बाबी प्रकर्षाने समोर आलेल्या होत्या. महाराष्ट्रातील निवडणुकांमुळे नवा गाळप हंगाम 15 नोव्हेंबर 2024 नंतर सुरु झाला आणि कर्नाटक शासनाने देखील 15 नोव्हेंबरचे फर्मान जारी केले. या दोन्ही राज्यातील ऊस गाळप जर 15 ऑक्टोबरला सुरु झाले असते तर या पेक्षा भयानक परिस्थिती समोर आली असती.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांसह उत्तर प्रदेशाचा अपवाद वगळता संपूर्ण देशाचा गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंतच चालेल आणि उत्तर प्रदेशातील धुराडी एप्रिलमध्यापर्यंत बंद होतील असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच कमी झालेल्या गाळप हंगामाचा विपरित आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांवर होणार असल्याची चिंता देखील त्यांनी व्यक्त केली. विशेषतः 200 साखर कारखाने असणार्या महाराष्ट्रासारख्या प्रगल्भ राज्यातील साखर उद्योगाचा यंदाचा गाळप हंगाम सरासरी फक्त 83 दिवस इतकाच चालला आहे. कोणताही कारखाना किमान 140 ते 150 दिवस चालला, तरच त्याचे अर्थकारण टिकत असते. यंदा 83 दिवसाचा हंगाम आणि त्यातून केवळ 80 लाख टन नवे साखर उत्पादन यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण साखर उद्योग यंदाच्या वर्षी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. 365 दिवसांच्या खर्चाचा डोंगर आणि 83 दिवसांचा हंगाम याचे गणित बसविणे महाकठीण असल्याची चिंता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या मते यंदाच्या कडवट हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरपासून सुरु होणार्या नव्या साखर हंगामाबाबत आशावाद आहे. 2024 मधील समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे उसाच्या नव्या लागणी मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. तसेच प्रमुख जलाशयातील पाण्याच्या साठ्यांमुळे यंदा तुटला गेलेला उसाचा खोडवा पुढील गाळप हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल. त्यातच ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आणि त्या पाठोपाठ भारतीय हवामान खात्याने यंदाचे भारतातील पाऊसमान समाधानकारक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या प्रमाणे घडल्यास उभ्या उसाच्या वाढीला आणि साखर उत्पादनाला चालना मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.