Thursday, January 8, 2026
Homeनगरउसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी हतबल

उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी हतबल

कारखान्यांनी टोळ्या परत नेल्याने ऊसतोडी रखडल्या

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

‘कोणी ऊसाला तोड देता का तोड’ असे म्हणण्याची वेळ परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे. ऊसाला तोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे साखर कारखाने उशीरा सुरू झाले. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा ऊस गळीत हंगाम नोव्हेंबर मध्ये सुरू झाला. त्यातच अवकाळी पावसाचा दणका बसला. त्यामुळे आठ, दहा दिवस ऊसतोड बंद पडली.त्यातून सावरतो नाही तोच कडाक्याची थंडी सुरू झाली आणि यात भर म्हणजे कमी प्रमाणात असणारे ऊस तोडणी मजूर या सर्वांचा ऊस तोडीवर परिणाम झाला आहे. परिणामी ऊसतोड धिम्यागतीने सुरू असल्याने उसाची तोड लवकर होत नसल्याने ऊस तोडीला नंबर लागले आहेत.

- Advertisement -

सुरुवातीला परिसरात बाहेरील साखर कारखान्यांच्या ऊसतोडणी मजुरांच्या मोठ्याप्रमाणात टोळ्या आल्या होत्या. महिनाभर ऊसतोड केल्यानंतर या टोळ्या पुन्हा संबंधित साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात बोटावर मोजाव्यात इतक्याच उसाच्या टोळ्या सध्या ऊसतोडीचे काम करत आहेत. ऊस जर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये तुटून गेला तर उसाच्या जागेवर कांदा किंवा गहू या दोन्ही पिकांपैकी एक पीक हमखास करता येते. परंतु, यंदा कारखाने उशीरा सुरू झाल्याने व ऊस तोडणी मजूर कमी असल्याने त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. डिसेंबरचा पहिला पंधरवडा संपला आहे.अजून आठवडाभरात जरी सुरुवातीला लागवड केलेला ऊस तुटला तर गहू किंवा कांदा होऊ शकतो. यासाठी शेतकर्‍यांचा ऊसतोड मिळवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. परंतु, ऊसतोड मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

YouTube video player

भुसार मालासाठी मजुरांचा असणारा तुटवडा. त्यावरुन होणारी हेळसांड यातून सुटका व्हावी, म्हणून परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळला आहे. अनेक शेतकर्‍यांनी टाकलेले कांद्याचे रोप लावायला आलेले आहे. मात्र ऊस तुटत नसल्याने शेतच शिल्लक नसल्याने ही रोपे तशीच पडून आहेत. तर अनेक रोपांवर करपा पडल्याने ती पिवळी पडली आहेत. अशी परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची बिकट अवस्था झाली आहे. दरवर्षी पाऊस कमी असल्याने व संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी असल्याने त्यांना बाहेरील तालुक्यातील उसाची जास्त गरज भासत होती. यंदा पाऊस जास्त झाल्याने त्यांच्याच कार्यक्षेत्रात उसाची लागवड जास्त झाल्याने त्यांना बाहेरच्या उसाची फारशी गरज भासत नाही. त्यांनी परिसरातील ऊस आधी उचलण्यावर भर दिल्याने आता बाहेरील ऊस आणण्याला उशीर होणार आहे. परिणामी परिसरातील ऊसतोड उशीरा होणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने यंदा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कांदा व गहू पिकाला मुकावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

परिसरात दाखल झालेल्या साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळ्या कमी असल्याने यंदा पुन्हा एकदा गाव टोळ्या ऊस तोडणीसाठी सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे देखील नंबर लागले आहेत. परंतु त्यांची संख्या कमी असल्याने वाट पाहाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यानेे शेतकरी चिंतेत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रिव्हॉल्वर हलगर्जीपणे हाताळल्याचा ठपका; दोन पोलीस अंमलदार निलंबित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना सुरक्षा देणारे दोन पोलीस बॉडीगार्ड कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत....