Wednesday, December 4, 2024
Homeनगरऊस वाहतुकदारांचा शेतकर्‍यांच्या प्रपंचाशी तर प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार

ऊस वाहतुकदारांचा शेतकर्‍यांच्या प्रपंचाशी तर प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

ऊस गळीत हंगाम जोरात सुरु झाल्याने श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गासह सर्वच मार्गांवर ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची गर्दी झाली आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक बेदकारपणे चालवित असल्याने तसेच रस्त्यावर ऊस सांडत जात असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान करून शेतकर्‍यांच्या प्रपंचाशी खेळत आहेत तर सांडलेल्या उसामुळे राज्यमार्गावरून प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांच्या अपघातास कारणीभूत होऊन प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत. परीवहन विभाग या प्रकाराकडे मात्र डोळेझाक करीत असल्याने त्याचा भुर्दंड शेतकर्‍यांना व प्रवाशांना बसत आहे.

- Advertisement -

दिवाळी सणानंतर ऊस गाळप हंगामाने चांगलाच वेग घेतला आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची राज्यमार्गावर रांग पहावयास मिळत आहे. त्यातच लग्नसराई सुरू असल्याने प्रवाशांचीही मोठी गर्दी राज्यमार्गावर होत आहे. दुरवस्था झालेला श्रीरामपूर नेवासा राज्यमार्ग आधिच खड्ड्यात हरवलेला असताना या मार्गावरून अशोक, प्रवरा, संगमनेर, संजिवनी, कोळपेवाडी, अगस्ती, युटेक या सर्वच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रंंदिवस रांगेने सुरू आहेत. त्यातच प्रवाशांच्या खाजगी वाहनांची मुळातच मोठी वर्दळ या राज्यमार्गावर असल्याने राज्यमार्गावरील वाढलेल्या गर्दीचा प्रवाशांना अनेकदा मनस्तापासोबतच अपघात होऊन दुखापतीचाही त्रास नित्याचाच झाला आहे.

ऊस तोडणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने ऊस तोडणी मशिनचा अवलंब बहुतांश साखर कारखान्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत सुरू केला आहे.

शेतातच हॉर्वेस्टींग मशिनच्या सहाय्याने ऊस तोडणी करून त्याचे छोटे-छोटे तुकडे थेट शेतातच वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये भरले जातात. त्यासाठी डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर व ट्रकचा वापर होत आहे. ही वाहने भरताना खचाखच शिग लावून भरली जातात. शेतकर्‍यांच्या शेतापासून ते कारखान्याच्या गव्हाणीपर्यंत हा मोठा प्रवास होतो. उसाच्या घुट्यांनी शिग लावुन भरलेली ही वाहने ताडपत्रीने झाकली जात नाहीत. राज्यमार्गाची दुरवस्था झाल्याने ही वाहने मोठमोठ्या खड्ड्यांमधून पुढे पुढे जात असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उसाच्या छोट्या छोट्या घुट्या सांडल्या जातात.

त्यामुळे जिवापाड जपलेल्या उसाचे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. ऊस वाहतूक करणारे वाहनचालक बेदरकारपणे चालून शेतकर्‍यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरून शेतकर्‍यांच्या प्रपंचाशीच खेळत आहेत. तर अनेकदा या वाहनांमधील उसाच्या घुट्या जवळून जाणार्‍या दुचाकीस्वारांच्या अंगावर पडून अपघात होऊन दुखापती झालेल्या आहेत. अनेक चारचाकी वाहनांच्या काचा फुटून आर्थिक नुकसानही झालेले आहे.

एवढं सगळं होत असलं तरी परिवहन विभाग बघ्याची भूमिका घेऊन या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे. राज्य मार्गावरून बेदकारपणे होत असलेली ऊस वाहतूक व त्यामुळे राज्यमार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी या विभागाने ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना ताडपत्री वापराच्या व योग्य प्रकारे ऊस वाहतूक करण्यासाठी बडगा उगारावा, अशी मागणी राज्यमार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून केली जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या