धामोरी |Dhamori
कोपरगाव तालुक्यातील साखर कारखान्यांची धुराडे पेटली आहेत. या भागात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या मुलाबाळांसह दाखल झाल्या आहेत. उसतोडीसाठी लहान मुले आपल्या पालकांना मदत करतात. त्यामुळे ऊसतोड मजुरांची मुलेही शिक्षणापासून दूर फेकली जात आहेत. ज्या मुलांच्या हाती पाटी, पेन, पेन्सिल, पुस्तक, वह्या हव्यात त्या मुलांच्या हाती कोयता, दोरी दिसत आहे. ती मुले शाळेऐवजी ऊसाच्या फडात राबत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून, परिसरात धुळे, जळगाव, नांदगाव, चाळीसगाव येथील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आपल्या मुला-बाळांसह आपला प्रपंच घेऊन दाखल झाले आहेत. त्यांनी तालुक्यात विविध ठिकाणच्या मोकळ्या जागेत आपल्या झोपड्याही बांधल्या आहेत. ते साधारण सात ते आठ महिने या कामात आपल्या मुला-बाळांसह व्यस्त असतात. त्यामुळे ती मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अगदी आपसूकच ऊसावर चालणार्या सपासप कोयत्याप्रमाणे मुलांच्या आयुष्यावर व शैक्षणिक जीवनावरही वार होत आहेत. ऊसतोडणी मजुरांच्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, चांगली नोकरी करावी असे त्यांचेही स्वप्न असावे मात्र, त्यांच्या मोठ्या आर्थिक टंचाईमुळे त्यांना ते शक्य होत नाही.
त्यामुळेच त्यांना नाईलाजाने मुलांना आपल्या सोबत ऊसतोड कामावर घेऊन यावे लागते. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक कारखान्यावर साखर शाळेची सोय करण्यात आली. परंतू ऊसतोड मजुरांच्या आर्थिक हलाखीमुळे व प्रबोधनाअभावी त्या शाळेत गळतीचे प्रमाणही वाढले आहे. काही ठिकाणी तर या साखर शाळाच गायब झाल्या आहेत. त्यातच काही ऊसतोड मजुरांच्या मुलांनी तर शाळेची पायरीच चढली नाही तर काही आर्थिक कुचंबनेमुळे शाळा अर्धवट सोडत असतात. यावर नक्कीच विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा ऊसतोड मजुरांच्या पोटी ऊसतोड मजुरच जन्माला यायलाही वेळ लागणार नाही.
ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी जि. प. सरकारी शाळांमध्ये तात्पुरत्या प्रवेशाची तरतूद आहे, आम्ही चार पाच दिवसांपूर्वी सर्वे केला. 6 ते 10 वर्षाची 11 मुले मुली आहेत. मुंलाचे वय जास्त असल्यास त्याला वयानुरूप त्या वर्गात बसविण्यात येऊन चांगली तयारी करून घेतली जाते. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांनी मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता नजिकच्या सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा.
– चंद्रशेखर कडवे, मुख्याध्यापक,प्राथमिक शाळा धामोरी.