छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
मुलगा परदेशात नोकरी करतो, भरपूर पैसे कमावतो, आपल्या मुलीला आनंदात ठेवेल अशी भाबडी आशा बाळगून कित्येक पालक आपल्या मुलीला परदेशात विवाह करून पाठवतात. परंतु, छत्रपती संभाजीनगरातील श्रीनिवार कुटुंबाने आपल्या मुलीने कॅनडात आत्महत्या केली असून तिच्या पतीसह सासरच्या मंडळींवर पोलिसात गुन्हा दाखल केला.
छत्रपती संभाजीनगरात राहणाऱ्या दाम्पत्याने मुलीचा विवाह मूळ बिदर येथील रहिवासी असलेल्या मुलासोबत थाटामाटात केला. मुलगी सासरी म्हणजे विदेशात गेली. सर्वच जण आनंदात होते. मात्र, लग्नानंतर मुलीचा नवऱ्यासह सासरच्यांनी माहेरहून पैसे व सोने आणण्यासाठी छळ सुरू केला. किरकोळ गोष्टीवरूनही तिला जाच केला जात होता. हा छळ वाढत गेला आणि मुलीने या छळाला कंटाळून कॅनडात आत्महत्या केली. शोकाकूल झालेल्या मुलीच्या माहेरच्यांनी अखेर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी कॅनडात मृत्यू आणि साताऱ्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता पोलिसांना कॅनडातून आरोपींना पकडून आणावे लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगरातील ईटखेडा, साई एन्क्लेव्ह येथे राहणारे प्रमोद विलासराव श्रीनिवार यांची मुलगी रिचाचा विवाह ३ जानेवारी २०२१ रोजी पीयूष दीपक नार्लावार याच्याशी झाला. तो कॅनडा येथे सध्या वास्तव्यास आहे. विवाहानंतर नोकरीनिमित्ताने पीयूष आणि रिचा अमेरिकेतही काही दिवस होते. दरम्यान, विवाहानंतर काही दिवसांनंतरच रिचाला माहेरहून पैसे, सोने आणण्यासाठी त्रास दिला जात होता. तुला नोकरी नसल्याचे टोमणे मारत तिचा मानसिक छळ केला जात होता. पीयूष आणि रिचा अमेरिकेत असताना सणानिमित्त श्रीनिवार कुटुंबीयांनी प्रथेप्रमाणे तिला खोबर्याचा हार पाठविला होता. तुझ्या माहेरचे अशा फालतू वस्तू कशाला पाठवितात, या कारणावरून पीयूषने रिचाला शिविगाळ करीत भांडण केले होते. दरम्यान, २०२२ साली पीयूषला कॅनडातील टोरँटो येथे नोकरी लागली. त्यामुळे ते अमेरिकेतून कॅनडात आले. तेथे नवरा पीयूष आणि सासरा दीपक रामभाऊ नार्लावार, सासू ज्योती दीपक नार्लावार तर नणंद पूजा किरण गदगी यांनीही तिचा छळ सुरू केला. तिला मारहाणही करण्यात आली. सततच्या छळामुळे रिचाने अखेर आत्महत्या केली, असे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रिचाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रिचाचे वडील प्रमोद श्रीनिवार यांनी सातारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रिचाचा पती पीयूषसह सासरा, सासू, नणंद यांच्याविरुद्ध हुंडाबळी कलमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.