Saturday, June 15, 2024
Homeनाशिकविवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या

विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

माहेरून पैसे आणण्यासाठी सासरकडून होणार्‍या जाचाला कंटाळून खतवड येथील विवाहितेने दोन मुलांसह शेततळ्यात उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली.

अश्विनी पूरकर (रा.धोंडगव्हाण वाडी, ता.चांदवड) यांचा विवाह अर्जुन सुदाम मुळाणे (रा. खतवड) यांच्याबरोबर 16 मे 2012 रोजी झाला. लग्नानंतर तीन वर्षांनी माहेरून पैसे आणण्यासाठी आश्विनीवर सासरच्यांनी दबाव आणला. याबाबत तिने माहेरच्यांनाही माहिती दिली. मात्र त्रास सुरूच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूल केले मात्र मुलीला त्रास देऊ नका, असे सांगितले.

सन 2018 मध्ये अश्विनीला सासू, नवरा व दीर यांनी शिवीगाळ व मारहाण केली.त्यामुळे अश्विनीच्या वडिलांनी पाच लाख रुपये रोख सासरच्यांना दिले. काही दिवस सारे काही ठीक चालले असताना पुन्हा पैशांची मागणी होऊ लागल्याने तिच्या वडिलांनी तीन लाख रुपये दिले. पाच ऐवजी तीनच लाख दिल्याने पुन्हा त्रास सुरू झाला. या त्रासाला कंटाळून अश्विनीने आज सिद्धेश (9) व विराज (6) या मुलांसमवेत घराच्या शेततळ्यात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.

अश्विनी यांचे वडील चंद्रकांत नारायण पूरकर यांच्या फिर्यादीनंतर अर्जुन सुदाम मुळाणे (पती), हिराबाई सुदाम मुळाणे (सासू), प्रमोद सुदाम मुळाणे (दीर) या तिघांविरोधात पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या