Wednesday, October 7, 2026
HomeनगरAhilyanagar : सुजय विखे, आ. राजळे, आ. लहामटे तसेच जगताप यांच्या उमेदवारीबाबत...

Ahilyanagar : सुजय विखे, आ. राजळे, आ. लहामटे तसेच जगताप यांच्या उमेदवारीबाबत आज निकाल

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोरील 14 हरकतींवरील सुनावणी पूर्ण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे, आ. किरण लहामटे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणोती, संगमनेरमधील उमेदवार चित्रा गायकवाड यांच्या उमेदवारी विरोधात मंगळवारी हरकती दाखल झाल्या आहेत. याबरोबरच सुजय विखे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख यांनीही विरोधी उमेदवाराविरोधात हरकती दाखल केल्या आहेत.दरम्यान, उमेदवारी दाखल केल्यानंतर छाननीच्या दिवशी दाखल उमेदवारींबाबत वेगवेगळ्या मतदारसंघातून चौदा हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली असून आज सकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दाखल आक्षेपांमध्ये संगमनेर 1, पाथर्डी 1, राहाता 2, कोपरगाव 2, अकोले 1, श्रीगोंदा 2, बिगरशेती मतदारसंघ- 2 एससी एसटी-1, महिला-1 इमाव-1, एकूण 14 हरकती दाखल झालेल्या होत्या. यावर मंगळवारी रात्री उशीरा सुनावणी पूर्ण झाली असून आज त्यावर निकाल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या निवडणुकीसाठी 369 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. या उमेदवारी अर्जांची मतदारसंघनिहाय छाननी मंगळवारी सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे व सहायक निवडणूक अधिकारी देविदास घोडेचोर व रावसाहेब खेडकर यांच्यामार्फत सुरू होती.

छाननी व हरकतींवर आज बुधवारी सकाळी 11 वाजता निकाल जाहीर करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मतदारसंघनिहाय अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. छाननीमध्ये उमेदवारी अर्ज योग्य पद्धतीने दाखल केला आहे का, त्यासोबत उमेदवार व त्यांच्या सुचक व अनुमोदकांनी योग्य पद्धतीने कागदपत्रे जोडली आहेत काय, याची पडताळणी निवडणुका अधिकार्‍यांमार्फत केली जात होती. त्याचवेळी उमेदवारी अर्जांवर कोणाची हरकत दाखल आहे का, याचीही विचारणा निवडणूक अधिकार्यांमार्फत केली जात होती. त्यासाठी उमेदवार व त्यांचे सुचक वकिलांसह उपस्थित होते. त्यांची मोठी गर्दी निवडणूक कार्यालयात झाली होती.

आमदार किरण लहामटे यांच्याविरुद्ध आक्षेप
आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उमेदवारी अर्जावर माजी आमदार वैभव पिचड यांनी हरकत घेतली आहे. त्यांनी अनुभवाचे प्रमाणपत्र बनावट दाखल केल्याचा आक्षेप घेण्यात आला. हा आक्षेप चुकीचा असल्याचे आमदार लहामटे यांचे म्हणणे होते. त्यावर आज निकाल दिला जाणार आहे.

प्रणोती राहुल जगताप यांच्या अर्जावर हरकत
माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणोती जगताप यांच्या उमेदवारी अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवार माजीमंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांनी हरकत घेतली आहे. जगताप यांचा कारखाना थकबाकीत असल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यावर जगताप यांच्या वकिलांकडून खुलासा करण्यात आला. मात्र निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

दहा वर्षांचे बंधन राहणार की जाणार?
भारतीय रिझर्व बँकेने सलग दहा वर्ष संचालक म्हणून राहता येणार नाही असे बंधन टाकले आहे. या बंधनात जिल्हा बँकेचे माजी संचालक सीताराम गायकर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी संचालक अंबादास पिसाळ हे अडकतात की त्यांचे अर्ज वैध ठरतात, याचाही निर्णय उद्या जाहीर केला जाणार आहे. मात्र या तिघांच्याही उमेदवारी अर्जावर या मुद्द्यावरून इतर कोणीही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हरकत दाखल केलेली नाही.

पोलिसांचा बंदोबस्त
नेवासा, संगमनेर, शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, नगर तालुका, जामखेड, राहाता, राहुरी, कोपरगाव, पारनेर, अकोले, कर्जत आणि श्रीगोंदा या सेवा सोसायटी मतदारसंघासह उर्वरित सात जनरल मतदारसंघातून दाखल उमेदवारी अर्जांची छाननी व हरकतींवरील सुनावणी काल झाली. यावेळी प्रमुख राजकीय नेत्यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आल्याने निवडणूक कार्यालयाबाहेर उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. संभाव्य तणावाची शक्यता लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आधी युक्तीवाद आणि नंतर जल्लोष
दरम्यान, सहकार कायदा 73 सी (ए) हा उमेदवार डॉ. सुजय विखे यांना लागू होत नाही. राहुरी कारखान्यांसाठी घेजलेले कर्ज आणि जिल्हा बँक निवडणुकीसाठीचा मतदारसंघ हे वेगवेगळ्या बाबी असल्याचा युक्तीवाद डॉ. विखे यांच्या वकीलांच्यावतीने करण्यात आला. सुनावणी झाल्यानंतर नगरमधील पुणे रोडवरील एका हॉटेलमध्ये उमेदवार विखे आणि त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास जल्लोष साजरा केला.

विखे व घोगरे यांचे परस्परविरोधी आक्षेप
सेवा सोसायटीच्या राहातामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी खासदार सुजय विखे व त्यांचे विरोधी उमेदवार एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी परस्परांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे. विखे यांनी राहुरी कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले, त्याची परतफेड केली नाही, ते थकबाकीदार आहेत, अशी हरकत घोगरे यांनी वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांच्यामार्फत दाखल केली तर एकनाथ घोगरे यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचकाने आपली स्वाक्षरी असल्याचे नाकारले, त्यानंतर त्याचा इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आला.

रणजीतसिंह देशमुख बिनविरोध होणार का ?
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख यांनी त्यांचे एकमेव प्रतिस्पर्धी उमेदवार चित्रा विठ्ठल गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. गायकवाड यांच्या सूचकाने अर्जावरील सही आपली नाही, असे निवडणूक अधिकार्‍यांसमोर सांगितले. यासंदर्भातही आज निकाल दिला जाणार आहे.

आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्ध हरकत
आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारी अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवार कडूचंद शेटे यांनी वकील गोरक्ष पालवे यांच्यामार्फत हरकत दाखल केली. आमदार राजळे वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या थकबाकीदार असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. त्यावरही उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : छाननीनंतर सुनावणीसाठी उमेदवारांसह इच्छुकांची धावपळ

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 369 उमेदवारी अर्जांची मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या कार्यालयात छाननी करण्यात आली. सकाळी 11 ते...