संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील सुकेवाडी येथे तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या याच्या घरात नाशिक विभागाच्या अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात 1 कोटी 14 लाख 4 हजार 800 रुपयांचा 456 किलो गांजा पकडला होता. मात्र यातील मुख्य आरोपी तुषार पडवळ हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. शनिवारी (दि.14) पहाटे त्याला घुलेवाडी येथून ताब्यात घेत अटक केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार पडवळ हा गेल्या तीन दिवसांपासून फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. तो घुलेवाडी परिसरात आल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेसह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि गुन्हे शाखेतील कर्मचार्यांनी पहाटेच्या सुमारास घुलेवाडी परिसरात सापळा लावून त्याला अटक केली आहे.
या घटनेची माहिती संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक विभागाच्या अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स विभागाला दिली आहे. सदर कारवाई पोलीस अंमलदार बाबासाहेब सातपुते, राहुल पांडे, विजय खुळे, अतुल उंडे, सागर नागरे यांनी केली आहे.




