भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.
ज्या काळात स्त्रियांवर अनेक बंधने होती, सामाजिक जीवनात त्यांचा सहभाग अत्यल्प होता, अशा काळात तेराव्या शतकाच्या प्रारंभी दिल्लीच्या सिंहासनावर एका महिलेने रझिया सुलतानने समर्थपणे आणि आदर्श राज्य केले. हे करताना तिला अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले. झगडावे लागले. राज्याच्या हितासाठी, आपल्या हक्कांसाठी ती लढली. ती स्व:ला पुरुषांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी समजत नव्हती म्हणून स्वत:ला राज्याची सुलताना न म्हणवता सुलतान म्हणवून घेत असे. एक उत्कृष्ट राज्य प्रशासक म्हणून तिने दिल्लीसारख्या शहरावर राज्य केले. हिंदुस्थानच्या इतिहासात राज्य करणारी पहिली मुस्लीम महिला शासक म्हणून तिचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले गेले.
रझियाचा जन्म उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये सुप्रसिद्ध शासक सुलतान अल्तमश यांच्या घरी झाला. सुलतान अल्तमश यांस रझिया ही एकुलती एक मुलगी होती. अनेक मुलांनंतर जन्माला आलेल्या आपल्या मुलीच्या जन्माचे त्यांनी भव्य स्वागत केले होते. त्यांनी आपल्या मुलांबरोबर मुलगी रझियालासुद्धा सैन्य प्रशिक्षण, राज्य कारभाराचे शिक्षण दिले. वडिलांनी आपल्या मुलीतील प्रतिभा तिच्या बालपणातच ओळखली होती. त्यामुळे त्यांनी कायमच तिला प्रोत्साहन दिले. वयाच्या तेराव्या वर्षीच मिळालेल्या शिक्षणामुळे एक कुशल धनुर्धर आणि पट्टीची घोडेस्वार म्हणून तिची प्रसिद्धी झाली. रझिया कायम वडिलांबरोबर लष्करी कवायत प्रशिक्षणाच्या उपक्रमात सहभागी होई. सुलतान अल्तमशने राजस्थानच्या मोहिमेवर जाताना आपल्या राज्याच्या व्यवस्थापनाचे कार्य रझियावर सोपवले. त्या मोहिमेवरून परत आल्यावर रझियाचे राज्य कारभारातील व्यवस्थापन पाहून ते आश्चर्यचकित झाले. म्हणाले, माझी ही छोटी मुलगी अनेक पुत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे.
सुलतान अल्तमश यांचा उत्तराधिकारी असलेला मोठा मुलगा अल्पायुशी ठरला. राज्याच्या वारसदाराचा प्रश्न आला तेव्हा सुलतानाला आपल्या सर्व मुलांमध्ये राज्य चालवण्यासाठी योग्य असे गुण रझियामध्ये दिसले. रजियामध्ये ते सर्व गुण होते जे एका राज्यकर्त्यात असतात. वेगवान घोडेस्वारी, निशानेबाजी, तिरंदाजी आणि तळपती तलवार या गोष्टींमध्ये तिच्या क्षमता निदर्शनास आल्या. वडील तिला रणांगणावर घेऊन जात असत. त्यामुळे ती शूर सैनिकाप्रमाणे लढण्याचा सराव करू शकली. तिच्या योग्यतेमुळे सुलतान अल्तमशने रझियाला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. तुर्की राजपुत्र हयात असताना एका मुलीला उत्तराधिकारी घोषित करणे त्या काळात आश्चर्यकारकच नव्हे तर ती एक स्वप्नवत गोष्ट होती. रझियाला सुलतान बनण्याचा मान इतका सहजासहजी मिळाला नाही. त्यासाठी तिची मेहनत, बुद्धिचातुर्य पणाला लागलेच, परंतु त्याबरोबरच आपल्या हक्कासाठी तिला संघर्ष करावा लागला.
सुलतान अल्तमशचा मृत्यू 1236 मध्ये झाला. त्या काळात एका स्त्रीला सुलतान म्हणून राज्य सिंहासनावर बसवणे समाजमान्य नव्हते. म्हणून त्यांनी रझियाला तक्तावर बसण्यास विरोध केला. राज्यातील काही प्रभावशाली लोकांनी रझियाचा भाऊ रुक्नुद्दीन फिरूझ शहा यास दिल्लीच्या तक्तावर बसवले. तो दुर्व्यसनी आणि चैनी होता. राज्य कारभारात त्याचे लक्ष नव्हते. रझिया आणि तिच्या इतर भावंडांना त्याच्या गटाकडून नष्ट करण्याचे कारस्थान सुरू झाले. हे लक्षात येताच दरबारातील सरदारांमध्ये असंतोष माजला.त्यांनी रझियाच्या मदतीने रुक्नुद्दीनविरुद्ध बंड केले. ज्यावेळेस प्रजा नमाजच्या वेळी एकत्र झाली होती तेथे रझियाने स्वतः जनतेला दर्शन दिले आणि राज्यावर असणारे अन्यायकारक राज्य व आपल्या वडिलांच्या इच्छेची आठवण करून दिली. तेव्हा सर्व जनता आणि शम्सी सरदार तिच्या पाठीशी उभे राहिले. रुक्नुद्दीनविरुद्ध बंड होऊन रझियाला सुलतान रझियतुघीन या नावाने तक्तावर बसवले. ही त्याकाळातील खूप मोठ्या बदलाची घटना म्हणता येईल.
पुरुषी वेश धारण करून ती हत्तीवरील हौदातून प्रजेला दर्शन देत असे. रणांगणातील नेतृत्व ती स्वतः करत असे. सैन्य संचलन व्यवस्थापनाकडे तिचे जातीने लक्ष असे. दरबारातील प्रत्येक काम ती स्वतः पाहून निकालात काढत असे. तिने अल्पावधीतच राज्यात अनेक विकासकामे केली. शिक्षणाला जोरदार पाठिंबा देऊन शिक्षण व्यवस्था वाढवण्यावर भर दिला. दिल्लीच्या राज्यव्यवस्थापनात शहाणपण आणि ज्ञानाचा वापर करून तत्कालीन सनातन आणि मुस्लीम समुदायाला चकित केले. एक दूरदर्शी, न्यायी, मुत्सद्दी आणि चांगली वागणूक देणारी नेता म्हणून ती जनमाणसात प्रसिद्ध झाली. अनेक बांधकाम प्रकल्प तिने पूर्ण केले. तिने दरबारातील प्रमुख सरदारांना विश्वासात घेतले आणि जिझिया कर रद्द केला. रस्त्यांची व्यवस्था, इमारतींची डागडुजी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या महत्त्वाच्या सुधारणा तिने केल्या. प्रशासनात शिस्त आणली. आपल्या नावाने नाणी पाडली. तिच्या नाण्यांवर ‘उम्दत-उल-निस्वा’ अशी मुद्रा असे. आपल्या राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था यावर तिने भर दिला. लष्करी व्यवस्था स्वतः इतकी अचूक ठेवली की दिल्ली कायम सुरक्षित ठेवली. राज्यात पाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे राखण्यासाठी विहिरी आणि कुपनलिका खोदल्या. एक आदर्श सम्राटासारखे राज्य पुढे नेण्याचा तिने प्रयत्न केला. इतिहासकार म्हणून सिराज लिहितात, सुलतान रझिया एक महान शासक होत्या. त्या समजूतदार, इमानदार होत्या. आपल्या प्रजेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध होत्या. त्यांच्यात एका आदर्श राज्यकर्त्याचे गुण होते. म्हणून पुरुषांच्या तुलनेत त्या कोणत्याही दृष्टीने कमी नव्हत्या.
रझिया सुलतानच्या पराक्रमामुळे आणि प्रभावी व्यवस्थापनामुळे अनेक श्रीमंत तुर्की सरदारांना तिचा मत्सर वाटू लागला. रझियाने राज्यातील बंडाचा भेदनीतीचा उपयोग करून विरोधकांचा निःपात केला आणि राज्यात शांतता प्रस्थापित केली. ग्वाल्हेरचा किल्ला सर केला आणि रणथंभोरमधील मुस्लीम सैनिकांना मुक्त केले. तुर्की सरदारांचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने जमालुद्दीन याकूत नावाच्या बिसिनियन गुलामाला शाही तबेल्याचे अमीर उम्र (प्रमुख) नेमले व त्यास अनेक अधिकार दिले. याशिवाय विश्वासातील सेवकांना उच्च पदे दिली. परिणामतः शम्सी सरदारांना एका स्त्रीचे वर्चस्व अपमानास्पद वाटू लागले.
याकूत हा रझियाच्या वडिलांचा गुलाम होता तसेच रझियाचा शिक्षकही होता. परंतु रजिया सुलतान आणि याकूत यांच्यात प्रेमसंबंध आहे या गैरसमजातून तुर्की सरदारांच्या गटाने याकूतला ठार केले. रझिया सुलतानविरुद्ध बंड करून तिला कैदेत टाकले. तिचा सावत्र भाऊ बेहरमशहा यास गादीवर बसवले. रझिया सुलतान कैदेतून पळून भटिंडाला जाण्यात यशस्वी झाली. भटिंडाचा शासक मलिक अल्तुनिया रजिया सुलतानच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिच्या प्रेमात होता. रझियाने दिल्ली राज्यासाठी अमीर मालिक अल्तुनियाशी हातमिळवणी करून त्याच्याशी विवाह केला. अल्तुनिया आणि रझिया सुलतान यांनी पूर्ण ताकदीनिशी दिल्लीवर रझियाचा भाऊ बेहरमशहा याच्यावर हल्ला केला. परंतु दिल्ली त्यांना घेता आली नाही. तिचा पराजय झाला. कारण शेजारील प्रदेशातील राजे रझिया सुलतानचा एक स्री म्हणून तिच्या राज्यकर्तेपदाच्या विरोधात होते. तिला कुणाकडूनही मदत मिळाली नाही. जंगलातून प्रवास करताना अल्तुनिया आणि रझिया या दोघांवर अज्ञात सैन्य तुकडीने हल्ला केला आणि त्यांची हत्या केली गेली. अशा रितीने 24 ऑक्टोबर 1240 दुर्दैवाने एका शूर, कुशल प्रशासक असलेल्या महिला सुलतान असलेल्या रझियाचा शेवट झाला. परंतु हिंदुस्थानच्या इतिहासात एक प्रभावी, पोलादी व्यक्तिमत्त्व म्हणून रझिया सुलतानची कारकीर्द आश्चर्यचकित करणारी अशीच आहे.