पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
उन्हाचा पारा 40 अंशांच्यापुढे सरकला असून ग्रामीण भागात संचारबंदी सारखे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराच्या बाहेर पडताना दिसत नाही. एरवी गजबजलेल्या नगर- पुणे मार्गावर सध्या शुकशुकाट दिसत असून वाढत्या उष्म्यामुळे मानवासह प्राणीमात्रांचा जीव कासावीस होताना दिसत आहे.
नगर-पुणे हा जिल्ह्यातील सर्वात गर्दी आणि व्यस्त असणारा प्रवासी मार्ग आहे. मराठवाड्यात जाण्याचा हा मार्ग असल्याने मुंबई- पुण्यावरून येणारी सर्व वाहतूक या मार्गावरून धावताना दिसते. यामुळे गेल्या काही वर्षात या मार्गावरील अर्थकारण बदललेले आहे. मराठवाड्याकडे जाणार्या खासगी वाहतुकीसह एसटी महामंडळाच्या बहुसंख्य बसेस या मार्गावर थांबा घेतात. मात्र आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली. सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. या मार्गावरील हॉटेल व्यवसायावरच अनेक गावाचे अर्थशास्त्र अवलंबून असून गेल्या काही वर्षांपासून परिसरातील शेतकरी विविध फळांचे उत्पादन, ताजी सेंद्रिय फळे शेताबाहेर स्टॉल लावून विकताना दिसत आहे.
शीतपेय, लस्सी याकडे लहान मुले व तरुणांचा ओढा असला तरी या पेयांना सुद्धा आता पूर्वीसारखी मागणी नाही. त्यातच उन्हाळ्याची तीव्रता व प्रखरता वाढल्याने रस्त्यावर ग्रामीण भागात सध्या शुकशुकाट दिसत आहे. दरम्यान, उन्हाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे सरकला असून यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे संचारबंदी सारखी परिस्थिती असून उन्हाच्या झळा आता माणसांसह प्राण्यांना बसताना दिसत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे चित्र असल्याचे दिसत आहे.
प्राण्यांचे हाल, पाणवठ्याची गरज
पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य विभाग असून अनेक ठिकाणी डोंगरदर्या असून त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची संख्या अधिक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजून उन्हाळ्यातील एप्रिल महिन्याचे 20 तर मे महिन्यातील 30 दिवस असे 50 दिवसांचा कालावधी आहे. यामुळे ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करण्याची मागणी होत आहे.