Friday, May 3, 2024
Homeब्लॉगरविवार 'शब्दगंध' : पर्यावरणप्रेमींचे यश टिकावे!

रविवार ‘शब्दगंध’ : पर्यावरणप्रेमींचे यश टिकावे!

नाशिक मनपा निवडणूक लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना नुकतीच घोषित झाली आहे. राजकीय पक्षांची आणि इच्छुकांची धावपळ वाढली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत नवीन नाशकात उड्डाणपुलासाठी झाडे तोडली जाण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. येत्या मनपा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार का? पर्यावरणाविरोधात जाऊन विकासासाठी झाडांवर घाला घालण्याची भूमिका पर्यावरणप्रेमी नाशिककरांना रुचेल का?

गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये (Nashik) मनपा प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी यांच्यात पुरातन झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून संघर्ष पाहावयास मिळाला. तीन वर्षांपूर्वी मुंबईत मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील झाडे तोडण्यास तेथील पर्यावरणप्रेमींनी अशाच प्रकारे रान उठवले होते. त्याचा पुनःप्रत्यय नाशकात आला. नवीन नाशकात उंटवाडीतील मायको चौकातील प्रस्तावित उड्डाण पुलासाठी २०० वर्षे जुन्या वटवृक्षासह साडे पाचशेहून जास्त झाडे जुनी झाडे तोडली जाणार असल्याचे पर्यावरणप्रेमी नाशिककरांना समजले.

- Advertisement -

जुन्या झाडांचे अस्तित्व संपवण्याच्या या प्रकाराविरोधात पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे धाव घेतली. झाडे वाचवण्यासाठी साकडे त्यांना घातले. पर्यावरणमंत्र्यांनीदेखील तेवढ्याच तत्परतेने त्याची दखल घेतली. ‘जुना वटवृक्ष तोडला जाणार नाही, शाश्वत विकासाच्या नावाखाली १०० वर्षे वयाची झाडे कापली जाणार नाहीत, विकास करताना पर्यावरण विचार प्राधान्याने केला पाहिजे.

नवीन नाशकात उड्डाण पुलाची खरेच गरज आहे का? ते तपासले जाईल, असे पर्यावरणमंत्र्यांनी ठासून सांगितले. शक्य तेवढी झाडे वाचवावीत, गरजेनुसार उड्डाणपूल आराखड्यात बदल करावा, असेही त्यांनी मनपा आयुक्तांना सांगितले. त्यानंतर झालेल्या नाशिक दौऱ्यात पर्यावरणमंत्र्यांनी उड्डाणपुलाचे गंडांतर आलेल्या प्राचीन वटवृक्षाला भेट देऊन आवर्जून पाहणी केली. वटवृक्षाला धक्का लागणार नाही, अशी दिलासादायी ग्वाही दिली. नाशकात सध्या विकासाची बरीच ‘स्मार्ट’ कामे सुरू आहेत.

त्यात नाशिककरांची दमछाक होत आहे. झाडांची आहुती देऊन उड्डाणपुलावरून चालत येणारा विकास वृक्षप्रेमी नाशिककरांना कसा रुचणार? म्हणूनच जुन्या झाडांच्या मुळावर उठलेल्या प्रस्तावित उड्डाणपुलाला सर्व थरातून विरोध होत आहे. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या तब्बल २,५०० हरकती मनपाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यात २,१०० मेल, २०० लेखी तक्रारींचा समावेश आहे. याप्रश्नी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरून पर्यावरणाबाबत नाशिककर किती जागरूक आहेत ते स्पष्ट होते.

नाशिककरांचा हा विरोध पाहता झाडांचा बळी घेऊ पाहणाऱ्या उड्डाणपुलाची गरज काय? असा घणाघाती सवाल जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यंतरी केला होता. सर्व बाजूंनी होणारी ओरड पाहता महापौरांनादेखील जनरेट्यापुढे नमते घेऊन प्रस्तावित उड्डाणपुलाच्या मार्गातील झाडांची पाहणी करावी लागली. झाडे तोडण्याबाबत मनपा आयुक्तांचीही प्रतिक्रिया आली. नवीन नाशिकच्या प्रवेशद्वारावरील जुना वटवृक्ष तोडण्यासाठी नव्हे तर त्याच्या फांद्या छाटण्यासाठी नोटीस लावण्यात आली होती.

मात्र मनपा सेवकांनी तशी विशेष खूण नोटिशीवर केली नाही, असे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले. वटवृक्ष तोडला जाणार नसून त्याच्या फक्त काही फांद्या तोडल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. एकूणच तो वटवृक्ष आता वाचला आहे. पर्यावरणप्रेमींना हायसे वाटावे असेच मनपा आयुक्तांचे स्पष्टीकरण आहे. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला नसता तर कदाचित २०० वर्षांहून अधिक वयाचा वटवृक्ष नामशेषही झाला असता. सामान्य नागरिकांकडून एखादे झाड तोडले गेले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते, पण येथे तर शेकडो वर्षे जुनी झाडे आडवी करण्याचे प्रयत्न सुरू होते. तूर्तास तरी ही झाडे वाचली याचे समाधान नाशिककरांना वाटत असेल. जागरूक पर्यावरणप्रेमींमुळेच नवीन नाशकातील इतर झाडे वाचू शकतील.

महाराष्ट्राच्या पर्यावरणस्नेही पर्यावरणमंत्र्यांनी नाशिकचा पुरातन वटवृक्ष धाराशायी होण्यापासून वाचवला याचे कौतुक आहेच. झाडे वाचवण्याचा पर्यावरणप्रेमींचा लढा नाशकापुरता मर्यादित नाही. राज्यात तो ठिकठिकाणी पाहावयास मिळतो. पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनी २०१९ सालात राज्यातील जनतेला याची प्रचिती आणून दिली आहे. मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील जागा देण्यात आली होती. कारशेडचे काम सुरू करण्यासाठी तेथील हजारो झाडे कापली जाणार असल्याची कुणकुण लागल्यावर पर्यावरणप्रेमींनी त्यास विरोध केला.

आरे जंगलातील झाडे तोडायला विरोध दर्शवण्यासाठी मुंबईकरांनी व्यापक आंदोलन उभारले होते. मात्र पोलीस बळ वापरून तो विरोध मोडीत काढण्यात आला होता. तरीही झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी लढतच राहिले. आझाद मैदानावर ‘आरे वाचवा’ आंदोलन करण्यात आले. सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक त्या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र आंदोलकांना गाफील ठेऊन तत्कालीन विकासपुरुषांनी कार्यभाग साधला.

आरेतील २,७०० झाडांची कत्तल एका रात्रीत केली गेली. आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आरेतील नियोजित मेट्रो कारशेड रद्द करून ते कांजूरमार्गाला नेण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला. झाडांच्या कत्तलीविरोधात लढणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. पुढे कांजूरमार्ग जागेवर केंद्र सरकारच्या खात्याने हक्क सांगितल्याने महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार असा नवा वाद उद्भवला.

झाडांवरील आक्रमणांबाबत पर्यावरणप्रेमी सदैव जागरूक असतात. म्हणून तर बरीच झाडे वाचतात, पण लहान-मोठे रस्ते, महामार्ग यांच्या कामांसाठी वा रुंदीकरणात ऊन वाऱ्याशी आणि पावसा-पाण्याशी वर्षानुवर्षे तोंड देत खंबीरपणे उभी असणारी शेकडो जुनी झाडे विकासाचा बळी ठरतात. शहरी भागात रस्ते रुंदीकरणात आड नेणारी झाडे शक्यतो न तोडता ती झाडे टाळून मार्ग काढला जातो.

काही झाडे मुळासकट काढून त्यांचे दुसरीकडे पुनर्रोपणही केले जाते. अगदीच अशक्य असेल तर अडथळा येणारी झाडे तोडून त्या बदल्यात नवी झाडे लावली जातात. विकासासाठी झाडे तोडताना त्या बदल्यात अमूक संख्येने झाडे लावावीत, असा नियम आहे, पण तो पाळला जातो का? झाडांची खरी किंमत आणि महत्व उन्हाच्या झळा बसल्यावर जास्त तीव्रतेने कळते. आजकाल शहरी भागात हिरव्या वृक्षराजी अभावानेच आढळतात. अनेक मजली इमारती वर्षे-दोन वर्षांत उभ्या राहतात, पण आजूबाजूला झाडांचे हिरवेपण दुर्मीळ असते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात हिरवाई हरवल्याची जाणीव निसर्गप्रेमी माणसांना पदोपदी झाल्याशिवाय राहत नाही. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे संदेश सरकारी पातळीवर नेहमी दिले जातात.

मात्र विकासकामांचा विषय आला की, हा संदेश देणाऱ्यांनाच त्या संदेशाचा विसर पडतो. समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा 12.5 लाख झाडे लावली जाणार आहेत, असे सांगण्यात आले आहे. या कामी किती झाडांना बलिदान द्यावे लागले ती नेमकी संख्या कळू शकलेली नाही. मात्र ज्या प्रमाणात झाडे लावली जात आहेत त्या अर्थी लाखो झाडांच्या समिधा महामार्गाच्या उभारणीत पडल्या असाव्यात. मुंबई-नागपूरदरम्यान वेगाने विकसित होणारा ‘समृद्धी महामार्ग’ महाराष्ट्राच्या वेगवान विकासाला पूरक ठरेल, असेही सांगण्यात येते. मात्र हा मार्ग पूर्ण होऊन वाहतुकीस खुला झाल्यानंतर महाराष्ट्रात किती समृद्धी येते ते यथावकाश कळू शकेल.

खरे तर महाराष्ट्राचा बहुतेक भूभाग निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. ‘वृक्ष वल्लीं’विषयीचे प्रेम महाराष्ट्राच्या नसानसांत भिणले आहे. नवी दिल्लीतील राजपथावर यंदा नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात त्याचे प्रतिबिंब चित्ररथाच्या रूपात उमटले. पर्यावरणाचा जागर करणारा महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ विषयावरचा चित्ररथ संचलनात सहभागी झाला होता. मात्र ‘नावडतीचे मीठ आळणी’च ठरले. पर्यावरण संदेशापेक्षा यावर्षी निवडणूक होणाऱ्या उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरवला गेला. तरीही लोकप्रिय निवड गटात महाराष्ट्राच्या चित्ररथाला पसंती मिळाली ही बाब मराठी जनांना अभिमानाची आहे.

नाशिक मनपा निवडणूक लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना नुकतीच घोषित झाली आहे. राजकीय पक्षांची आणि इच्छुकांची धावपळ वाढली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत नवीन नाशकात उड्डाणपुलासाठी झाडे तोडली जाण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. येत्या मनपा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार का? पर्यावरणाविरोधात जाऊन विकासासाठी झाडांवर घाला घालण्याची भूमिका पर्यावरणप्रेमी नाशिककरांना रुचेल का? हिरवीगर्द संपत्ती जतन करणारा विकास हवा की हिरवाई गमावून झालेला शुष्क विकास? यातून एक पर्याय निवडण्यास सांगितला तर नाशिककर पहिल्या पर्यायाला, म्हणजे घनगर्द हिरवाईलाच प्राधान्य देतील यात तीळमात्र शंका नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या