Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगआघाडीला 'आघाडी'!

आघाडीला ‘आघाडी’!

शिवसेनेत (shivsena) फूट पाडून राज्याची सत्ता मिळवण्यात भाजप (BJP) भलेही यशस्वी झाला असला तरी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) ताकद आणि प्रभाव राज्यात कायम असल्याचे शिक्षक पदवीधर निवडणुकांच्या (Teacher Graduate Elections) ताज्या निकालांवरून स्पष्ट होते. हे निकाल आगामी निवडणुकांसाठी आघाडीला बळ देणारे आहेत. मागील वर्षी राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) भाजपने काही मते फोडून आघाडीला धक्का दिला होता. आताच्या निवडणुकीत भाजपच्या हक्काच्या दोन जागा जिंकून आघाडीने तो हिशेब चुकता केलेला दिसतो.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडी यांनी प्रतिष्ठेच्या केल्याने त्या मोठ्या चुरशीत पार पडल्या. मतमोजणी होऊन निकाल नुकतेच जाहीर झाले. पाच जागांपैकी नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद या तिन्ही जागा आघाडीने जिंकून निवडणुकीत वर्चस्व मिळवले आहे. भाजपला मात्र मोठा फटका बसला. विदर्भ आणि मराठवाड्यात आघाडीच्या उमेदवारांनी भाजप उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. कोकणची एकमेव जागा भाजपला जिंकता आली. कोकणात धडक मारण्याच्या नादात नागपूर आणि अमरावतीच्या दोन्ही हक्काच्या जागा भाजपच्या हातून निसटल्या आहेत. राज्यसत्तेत असूनही विधान परिषद निवडणुकांचे निकाल भाजपविरोधात गेल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. असे का घडले? शिवसेनेत फूट पाडून शिंदे गटाच्या सोबतीने राज्यात सत्ता स्थापन केल्याचा हा परिणाम असेल का?

- Advertisement -

पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांपैकी नाशिकमधून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे तर अमरावतीतून आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे निवडून आले. शिक्षक मतदारसंघांच्या तीन पैकी नागपूरच्या जागेवर आघाडीचे सुधीर अडबाले विजयी झाले. त्यांनी भाजप समर्थित आमदार नागो गाणार यांना पराभूत करून त्यांची हॅट्ट्रिक हुकवली. औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय संपादन केला. कोकणची जागा भाजपने खेचून आणून आघाडीला चकित केले. पाचही जागा जिंकण्याचा दावा भाजप आणि आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता, पण मतदारांनी तो साफ खोटा ठरवला.

कोकणातील पराभव आघाडीसाठी जसा अनपेक्षित, तसाच नागपूर आणि अमरावतीतील पराभव भाजपसाठी, विशेषत: भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, केंद्रीय मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. अमरावती मतदारसंघात फेरमतमोजणीची मागणी झाल्याने तेथे तब्बल 30 तास मतमोजणी चालली. अखेर आघाडीच्या धीरज लिंगाडे यांनी भाजप आमदार डॉ. रणजित पाटील यांचा 3,368 मतांनी पराभव केला. डॉ.पाटील हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अतिशय निकटचे सहकारी म्हणून त्या मतदारसंघात ओळखले जातात. नाशिकमध्ये काँग्रेस आणि आघाडीची कोंडी करण्याची पडद्याआडून खेळी करणार्‍या भाजपला आघाडीने नागपूरच्या बालेकिल्ल्यात दिलेला धोबीपछाड पुढील काळातील निवडणुकांच्या दृष्टीने भाजपसाठी धोक्याचा इशारा आहे. भाजपचा बालेकिल्ल्यातील पराभव शिंदे गटाचीही काळजी वाढवणारा आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष सत्यजित तांबे यांनी घवघवीत यश मिळाले. 29 हजारांचे मताधिक्क्य मिळवून पहिल्या पसंतीच्या कोट्यापेक्षा 10 हजार जास्तीच्या मतांसह त्यांनी विजयाला गवसणी घातली. डॉ. तांबे यांच्यानंतर सलग चौथ्यांदा तांबे कुटुंबात आमदारकी चालून आली आहे. नाशिकची निवडणूक सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरली. काँग्रेसची ही हक्काची जागा असल्याने आघाडीने ती काँग्रेसकरता सोडली होती, पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसची उमेदवारी जाहीर होऊनदेखील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाला संधी दिली. डॉ. तांबे यांच्याऐवजी सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. नाशिकच्या जागेबाबत भाजपने अखेरपर्यंत सावध भूमिका घेऊन उमेदवार दिला नाही अथवा कोणत्याही अपक्षालासुद्धा अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला नाही. भाजपची ही भूमिका आघाडीला संशयास्पद वाटली. सत्यजित यांनी पाठिंबा मागितल्यास त्याचा विचार केला जाईल, अशी इशारेवजा सूचना भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली होती, तर आघाडीनेही त्यावर सोयीस्कर मौन पाळले, पण तांबे यांनी अपक्षच लढणे पसंत केले. अनेक शिक्षक संघटनांचा पाठिंबा त्यांनी मिळवला.

काँग्रेससह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळवण्यातही त्यांना यश आले. आमदार डॉ. तांबे यांनी कसलेला हा मतदारसंघ असल्याने सत्यजित यांना ही निवडणूक सोपी होती. पित्याच्या लोकसंपर्काचा फायदा तांबे यांना झाला. तांत्रिक कारणाने एबी फॉर्म दाखल करता न आल्याने अपक्ष लढत आहोत, पण आपण काँग्रेसचेच उमेदवार आहोत, असे ते सुरुवातीस सांगत होते. मात्र डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित यांनी अपक्ष अर्ज भरल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस नेतृत्वाने पिता-पुत्रावर निलंबन कारवाई केली. पित्याच्या पुण्याईवर तांबे निवडून आले आहेत. त्यांच्या विजयाने मतदारसंघातील काँग्रेसचे वर्चस्व ठासून सिद्ध झाले. ‘निवडणुकीत काँग्रेसचे पाठबळ मिळाले असते तर विजयाचा अधिक आनंद झाला असता’ अशी भावनिक प्रतिक्रिया सत्यजित यांनी विजयानंतर व्यक्त केली ती बरीच सूचक आहे. सत्यजित यांच्या बाबतीत आता काँग्रेस नेतृत्वाकडून काय भूमिका घेतली जाते याची सर्वांना उत्सुकता आहे.

भाजपने नाशिकमध्ये काँग्रेस व आघाडीचा खेळ बिघडवला खरा, पण शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपला अपेक्षित असलेल्या यशाची चमक दाखवता आली नाही. नागपूर आणि अमरावती या भाजपच्या हक्काच्या जागा आघाडीने खेचून आणल्या आहेत. कोकणात आघाडीची जागा जिंकल्याचा भाजप नेत्यांचा आनंद हक्काच्या दोन जागा गमावल्याने निस्तेज झाला असेल. शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाचपैकी चार जागा जिंकण्याची संधी होती, पण नाशिकमधील नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने नाशिकची सहज जिंकता येणारी हक्काची जागा तांत्रिकरीत्या काँग्रेसला गमवावी लागली.

कोकणात भाजपची सरशी झाली असली तरी विजयी उमेदवार ज्ञानेश्‍वर म्हात्रे मूळचे शिवसेनेचे आहेत. शिंदे गटाने भाजपला हा उमेदवार दिला, ठाणे-पालघर भागात मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रभाव आहे. त्याचा फायदा होऊन म्हात्रे सहज विजयी झाले, असे म्हटले जाते. त्यामुळे भाजपची पाटी कोरी होता-होता राहिली. अन्यथा या निवडणुकीत 5-0 असा खणखणीत विजय आघाडी मिळवू शकली असती. मात्र नाशिकमधील बिघडलेले गणित आघाडीची जागा कमी करून गेले. जुनी पेन्शन पुन्हा लागू करण्याची मागणी शिक्षक व पदवीधर निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला. जुनी पेन्शन लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून प्रतिकूल मतप्रदर्शन केल्याने त्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ‘नो पेन्शन, नो वोट’ अशा परखड प्रतिक्रिया मतदारांनी मतपत्रिकांवर लिहिल्याचे मतमोजणीवेळी आढळून आले. याचा अर्थ नाराज झालेल्या शिक्षक आणि पदवीधरांनी मतपेटीतून आपला रोष प्रकट करून भाजपला धडा शिकवला असावा.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 जागा तर विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकू,अशा गर्जना करणार्‍या भाजप नेत्यांना शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांतील अपयशाचे चिंतन करूनच पुढील रणनीती नव्याने आखावी लागेल. शिवसेनेत फूट पाडून राज्याची सत्ता मिळवण्यात भाजप भलेही यशस्वी झाला असला तरी राज्यात महाविकास आघाडीची ताकद आणि प्रभाव कायम असल्याचे ताज्या निवडणूक  निकालांवरून स्पष्ट होते. भाजपची झालेली पीछेहाट शिंदे गटाच्या नेत्यांसाठीदेखील धोक्याचा इशारा देणारी आहे. मागील वर्षी राज्यसभा निवडणुकीत भाजपने काही मते फोडून आघाडीला धक्का दिला होता. आताच्या निवडणुकीत भाजपच्या हक्काच्या दोन जागा जिंकून आघाडीने तो हिशेब चुकता केलेला दिसतो. मात्र शिक्षक-पदवीधरचे निकाल आघाडीला आगामी निवडणुकांसाठी बळ देणारे आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या