Saturday, July 27, 2024
Homeनगरपाच वर्षे विकासकामे केली असती तर प्रभाग समस्यानगरी झाला नसता - सुनील...

पाच वर्षे विकासकामे केली असती तर प्रभाग समस्यानगरी झाला नसता – सुनील गंगुले

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पाच वर्षे नगरपालिकेची सत्ता असताना देखील कोपरगाव शहराच्या विकासाच्या समस्या सुटलेल्या नाहीत. ना. आशुतोष काळे प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला सूचना देऊन समस्या सोडविण्यासाठी ते पाठपुरावा करीत आहेत. मागील पाच वर्षे प्रभागाचा विकास करू न शकलेल्या विरोधकांना मात्र हे सहन होत नाही. विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले अपयश दुसर्‍यावर लोटण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर मागील पाच वर्षे त्यांनी प्रभागात विकासकामे केली असती तर प्रभागाची समस्या नगरी झाली नसती अशी उपरोधीक टीका कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केली आहे.

- Advertisement -

ना. आशुतोष काळे कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या अडचणी प्रशासकीय अधिकार्‍याच्या उपस्थितीत जाणून घेत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकार्‍याला त्या ठिकाणी सूचना देऊन ते प्रश्न सोडवले जात आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी व समस्या मांडत आहेत. नुकत्याच त्यांनी जुन्या प्रभाग क्रमांक चार मध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना नागरिकांनी त्यांच्या पुढे समस्यांचा पाढा वाचला. त्यामुळे त्यांनी उपहासात्मकपणे त्या प्रभागास समस्यानगरी असे संबोधायचे का? असा प्रश्न केला. त्याचे त्या प्रभागातील कोल्हे गटाचे नगरसेवक विजय वाजे यांच्या चांगलेच वर्मी लागले. त्यांनी सोशल मीडियावर आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा सुनील गंगुले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

त्यांनी म्हटले आहे, ना.काळे यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असून त्यांनी प्रभाग 4 ला 1 कोटी आणि संपूर्ण कोपरगाव शहरासाठी 268 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यांच्यामुळे मागील अनेक वर्षांपासूनचा शहराचा पाणी प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. त्याहीपुढे जाऊन प्रत्येक प्रभागातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न व अडचणी जाणून घेऊन ते त्या सोडवत आहेत व आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत. त्यामुळे भविष्यात आपले काही खरे नाही याची भीती विरोधकांना वाटत असल्यामुळे उद्विग्न होऊन आपल्या सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.

ज्या वाजे कुटुंबाकडे जुन्या प्रभाग 4 ची मागील 20 वर्षांपासून सत्ता आहे त्या प्रभागाची आज समस्यानगरी होऊन बसली आहे. त्यांना 3 वर्षांचा हिशोब मागायचा अधिकार आहे का? हे त्यांनी अगोदर आपल्या मनाला विचारले पाहिजे. जनतेने 20 वर्षे खूप सोसलं आहे. जनता मागील अडीच वर्षांत विकासाच्या बाबतीत कोपरगावमध्ये झालेला बदल अनुभवत असल्याचे सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या