Friday, November 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजज्याच्या डोक्यावर ‘शेटेंचा हात’ तोच होतो आमदार…

ज्याच्या डोक्यावर ‘शेटेंचा हात’ तोच होतो आमदार…

सुनीता चारोस्करांना वाढत्या पाठिंब्यामुळे विरोधक हतबल

- Advertisement -

मोहाडी । प्रतिनिधी Mohadi

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुनीता रामदास चारोस्कर यांना मतदारसंघामध्ये पाठिंबा वाढत असून मतदारांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे विरोधक हतबल झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील गटागटांमध्ये सुनीता चारोस्कर यांचे जोरदार स्वागत होत आहे. त्यातच दिंडोरीच्या आतापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये ज्या उमेदवाराच्या डोक्यावर कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांचा हात असतो तोच उमेदवार विजयी होतो, हा इतिहास आहे. .

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या पाठीमागे श्रीराम शेटे भक्कमपणे साथ देत गावोगावी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या रुपाने दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाला प्रथम महिला आमदार मिळणार असल्याचा आशावाद नागरिक व्यक्त करत आहेत. ज्याच्या डोक्यावर ‘शेटेंचा हात’ तोच होईल दिंडोरीचा ‘आमदार’ अशी चर्चा सध्या मतदारसंघात होत आहे.


दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना सुरू झाला आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ यांची निवड झाल्यामुळे मतदारसंघाचा मोठा विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मतदारसंघात विकासाची गंगा पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच पाच वर्षांच्या कालावधीत झिरवाळांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याची चर्चा सुरू आहे. गावोगावी जोडणारे रस्ते खड्डेमय असल्याने नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.


उच्चशिक्षित आणि पतीच्या राजकीय चढउतारात भक्कमपणे साथ देत आपली स्वतःची ओळख निर्माण करत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती म्हणून सुनीता चारोस्कर यांनी यशस्वी कामकाज केले आहे. कर्तृत्व सिद्ध करण्याची जिद्द आणि संयमी वाटचालीतून सुनीता चारोस्कर यांनी नावलौकिक मिळवला आहे. माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांची भाची म्हणून त्यांना थोडासा माहेरकडून राजकीय वारसा लाभला असला तरी त्यांची राजकारणाची खरी सुरुवात त्यांच्या लग्नानंतर झाली.

माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्याशी विवाह झाल्यानंतर रामदास चारोस्करांची राजकीय वाटचाल त्यांनी जवळून पाहिली. प्रथमतः तत्कालीन दिंडोरी गट व आताच्या मोहाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुनीता चारोस्कर यांनी काम पाहिले. त्यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या निधीतून मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला आदर्श आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला होता. सुनीताताई चारोस्कर या मागील निवडणुकीत उमराळे बु. गटातून निवडून आल्या आणि त्यांना जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतिपदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी अपंगांना सोयीसुविधा देण्यात लक्ष केंद्रित केले. परिषदेकडून अपंगांना देण्यात येणार्‍या साहित्यांचे पुरेपूर वाटप होतो की नाही याची दक्षता घेतली.

जिल्हा परिषदेत दिव्यांगांना लिफ्टची व्यवस्था केली. आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये सोयीसुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा परिषदेकडून चारचाकी वाहने, शेतकर्‍यांसाठी ड्रिप योजना, अपंग व्यक्तींना घरकुले, दलित वस्ती सुधारणा यात गटारी, हायमास्ट, पेव्हर ब्लॉक, पाण्याच्या टाक्या इत्यादी समाजोपयोगी काम समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून केले आहे. या कार्यकाळात त्यांनी कोट्यवधींची विकासकामे केली आहेत.


यावेळी फक्त दिंडोरी तालुक्यासाठी नव्हे तर जिल्हाभर कामे करत सुनीता चारोस्कर या नावाची स्वतःची ओळख निर्माण केली. जिल्हा परिषदेमध्ये नावलौकिक मिळवून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे दिंडोरी-पेठ विधानसभेच्या आमदार म्हणून त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.


कादवा कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या मानस कन्या म्हणूनदेखील त्यांची ओळख आहे. त्यात खासदार भास्कर भगरे यांचे पाठबळ आणि बंधुतुल्य, दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तथा मविप्र संचालक प्रवीणनाना जाधव यांच्याबरोबरच शिवसेना ठाकरे गटाचे सर्व शिलेदार व माकपचे स्वाभिमानी कार्यकर्ते यांच्या खंबीर साथीमुळे त्या विजयाच्या समीप पोहोचतील, अशी चर्चा सध्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात रंगू लागली आहे. एकंदरीतच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला वाढता पाठिंबा बघून विरोधक हतबल झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

अपक्ष उमेदवार सुशीला चारोस्कर यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन पूर्वीपासून काम करत असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काम करत असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. सुप्रिया सुळे, श्रीराम शेटे, दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सक्रिय कार्यरत आहे. मी सुशीला शिवाजी चारोस्कर विधानसभा 2024 साठी विधासभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु मी आजारानिमित्त बाहेरगावी असल्याने मला उमेदवारीतून माघार घेता आली नाही. परंतु शरद पवार यांच्या विचारांशी बांधलकी असल्याने मी विधानसभेसाठी केलेल्या उमेदवारीमधून माझी जाहीररीत्या माघार घेत आहे व माझी निशाणी असलेली ट्रमपेट या चिन्हासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनीता रामदास चारोस्कर-निशाणी तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीसह उमेदवारास जाहीर पाठिंबा देत असल्याचे अपक्ष उमेदवार सुशीला शिवाजी चारोस्कर यांनी जाहीर केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या