पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पुणे-नगर महामार्ग, सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर शनिवार (दि.25) सकाळी 8 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग, महसुल विभाग यांच्यावतीने अतिक्रमणावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. यात 100 पेक्षा अधकि अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर औद्योगिक वसाहत चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे तात्काळ काढून घ्यावेत असे आदेश देण्यात आले होते. परंतू स्वत:हून अतिक्रमणे काढली जात नव्हती. मध्यंतरी लोकसभा निवडणूक लागल्याने ही मोहीम थंडावली होती. मात्र शनिवारी सकाळी सात वाजता पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सदर अतिक्रमण काढण्यात येणार आहे. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. त्या आगोदर सार्वजनिक बांधकाम विभागणी नोटीसा दिल्या होत्या.
या फौज फाट्यात 2 डिवायएसपी, 7 पोलिस निरीक्षक, 10 साह्यक निरिक्षक, दंगल नियंत्रण पथक, एसआरपी पथक, 100 पोलीस कर्मचारी, 5 जेसीबी, चेतक एंटरप्रायजेसचे अधिकारी व कर्मचारी, जाळीच्या गाड्या असा फौज फाटा बस स्थानक चौकात दाखल झाल्याने अतिक्रमण धारकांची एकच तारांबळ उडाली. प्रथम सुपा बसस्थानक चौक ते औद्योगिक वसाहत चौकापर्यंत अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांची दुकाने, चहा सेंटर, चपलांची दुकाने, कपड्यांची दुकाने, मटन शॉप, पानटपरी, बाजार तळ समोरील अतिक्रमण, सुपा हाईट्स समोरील कंपाऊंड, तसेच शहाजापुर चौकात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले मळगंगा देवीचे मंदिर अतिक्रमणात असल्याने तेही जमीन दोस्त करण्यात आले. तर औद्योगिक चौक ते नगर-पुणे महामार्ग अंतर्गत अतिक्रमणे देखील काढण्यात आली.
अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली, जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणात असलेल्या टपर्या जमीनीदोस्त करण्यात असल्याने टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर औद्योगिक वसाहतीमधील चौकात अतिक्रमण धारकांनी स्वतः हून आपले अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. पुणे-अहमदनगर महामार्गावरील बेकरींच्या परिसरातील अतिक्रमणेही काढण्यात आली.