Thursday, May 14, 2026
Homeनगरसुपा परिसरातील स्वयंघोषित 'किंग'वर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी नाशिक कारागृहात रवानगी

सुपा परिसरातील स्वयंघोषित ‘किंग’वर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी नाशिक कारागृहात रवानगी

पारनेर । तालुका प्रतिनिधी

सुपा औद्योगिक वसाहत आणि महामार्ग परिसरात दहशत माजविणारा, वाहने लुटणारा आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारावर सुपा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

- Advertisement -

स्वतःला ‘सुप्याचा किंग’ समजणाऱ्या गौरव हरिभाऊ घायाळ (रा. सुपा, ता. पारनेर) याच्यावर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील एक वर्षासाठी नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.

गौरव घायाळ याच्यावर २०१८ पासून गुन्हेगारी कारवायांचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने सुपा शहरात आणि एमआयडीसी परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणे, सर्वसामान्यांना मारहाण करणे आणि सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांवर हल्ले करणे, अशा विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांची मोठी यादी त्याच्या नावावर आहे.

त्याच्या या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर, त्याला तात्काळ ताब्यात घेऊन नाशिक कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

या गुन्हेगाराच्या गुन्हेगारीचा आलेख पाहिला तर, त्याच्यावर सुपा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले, जीवे मारण्याचा प्रयत्न, जातीवाचक शिवीगाळ (ॲट्रॉसिटी), विनयभंग आणि तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन अशा कलमांचा समावेश आहे. विशेषतः २०२३ ते २०२६ या कालावधीत त्याने सलग अनेक गुन्हे केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात बदल होत नसल्याने अखेर त्याला कडक कायद्याचा दणका देण्यात आला आहे.

सुपा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी या कारवाईनंतर गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे. सुपा, म्हसणे फाटा आणि एमआयडीसी परिसरात जर कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा उद्योजकांना त्रास दिला, तर त्यांच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) किंवा ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत असून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, स्नेहा शिवले यांच्यासह पोलीस कर्मचारी अशोक मरकड, राहुल गोरे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, प्रशांत दिवटे, विकास गायकवाड, अमोल साळवे, भगवान वंजारी, कृष्णा साळवे आणि कल्याण लगड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ मोठे निर्णय; नाशिक...

0
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...