सुपा |वार्ताहर| Supa
सुपा पोलिसांनी शनिवारी बेशिस्त व विनाकारण फिरणार्या नागरिकांवर 500 रुपये प्रमाणे दंडाची कारवाई केली.
यावेळी काही नागरिकांना ऑनलाईन दंडही ठोठावला. विनाकारण फिरणार्यांवर कारवाई केल्याने गावातील सामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने शुक्रवारपासून संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. जिल्हा तालुका प्रशासनाने बंदचे सक्त आदेश दिले आहेत. यात औषध दुकाने व रुग्णालये सोडून सर्व व्यवसाय बंदचे आदेश आहेत तर नागरिकांनी अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे असे निर्देश असताना नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आसल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर सुपा पोलिसांनी अशा नागरिकांवर शनिवारी कारवाई केली.
यात बहुतांशी मोटारसायकल चालक होते. पोलिसांनी अडवल्यावर कुठे फिरतो असे विचारल्यावर प्रत्येकजणाने दवाखान्याचे, मेडिकलचे कारण पुढे केले. यावेळी सुपा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पीएसआय कोसे म्हणाले, विनाकारण फिरणार्यांपैकी 90 टक्के नागरिक दवाखान्यांत गेलो होतो. मेडिकलमध्ये चाललो असे सांगत होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता चार विक्सच्या गोळ्या घेण्यासाठी ते बाहेर पडल्याचे दिसून आले.
सुपा पोलिसांनी शनिवारी सुपा बसस्थानक चौक व पारनेर रोड एमआयडीसी चौक अशा दोन ठिकाणी वाहनचालक व येणार्या जाणार्यांची चौकशी केली. यात विनाकारण फिरत असलेल्या नागरिकांना 500 रुपयांप्रमाणे दंड केला. या कारवाईने विनाकारण फिरणारांवर चाप बसला आहे. तर सुप्यातील सर्वसामान्य नागरिक या कारवाईचे स्वागत करत बंद काळात पोलिसांनी अशीच कारवाई करावी, अशी मागणी केली.