पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
सुपा-शहाजापूर रस्त्यावरील तांगडे वस्ती येथे मंगळवारी (दि.13) मध्यरात्री आठ ते नऊ अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून महिलांना मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 90 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी रावसाहेब मारुती तांगडे (वय 64, व्यवसाय शेती, रा. झरेकर वस्ती, सुपा, ता. पारनेर) यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन 8 ते 9 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत नमूद केले आहे की, रावसाहेब मारुती तांगडे हे झरेकर वस्ती (तांगडे वस्ती), सुपा येथे पत्नी संगीता आणि आजारी मुलगी स्वाती यांच्यासह राहतात. सोमवारी (दि.12) रात्री 11 च्या सुमारास तांगडे कुटुंब जेवण करून हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री 12:30 च्या सुमारास घराबाहेर कुत्री जोरात भुंकू लागल्याने रावसाहेब तांगडे यांना जाग आली. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला असता, अंगणात आठ ते नऊ अनोळखी इसम उभे होते. या सर्वांनी तोंडाला काळे कापड बांधले होते आणि काळ्या रंगाचे जॅकेट व पॅन्ट घातली होती.दरोडेखोरांनी रावसाहेब तांगडे यांना धमकावून घरात नेले आणि खुर्चीवर बसवले. गोंधळ ऐकून त्यांची पत्नी आणि मुलगी जागे झाले असता, दरोडेखोरांनी हातातील कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केली.
एका दरोडेखोराने संगीता तांगडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र ओढले. कानातील कर्णफुले काढताना त्यांनी प्रतिकार केला असता, चोरट्यांनी त्यांच्या श्रीमुखात लगावून मारहाण केली. अखेर जीवाच्या भीतीने संगीता यांनी स्वतःहून कर्णफुले, नाकातील मोरणी आणि पायातील जोडवे काढून दिले. मुलगी स्वाती हिच्या हातातील सोन्याची अंगठी निघत नसल्याने चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने ती बळजबरीने कापून काढली. स्वाती हिचेही कर्णफुले आणि सोन्याचे मनीमंगळसूत्र त्यांनी हिसकावून घेतले. रावसाहेब तांगडे यांच्या खिशातील 12 हजार रुपये आणि कपाटातील 8 हजार रुपये अशी एकूण रोख रक्कमही चोरट्यांनी लांबवली.
तांगडे यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांची वृद्ध आई एकटीच राहते. मुख्य घरात लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी तांगडे कुटुंबाचे मोबाईल फोन काढून घेतले आणि त्यांना घरात कोंडून बाहेरून कडी लावली. त्यानंतर त्यांनी आईच्या घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. तिलाही मारहाण करून गळ्यातील सोन्याचे मणी, कर्णफुले आणि कमरेच्या पिशवीतील 8 हजार रुपये लुटले. दरोडेखोर निघून गेल्यानंतर तांगडे यांनी शेजारी बबन झरेकर यांना आवाज देऊन बोलावले आणि आपली सुटका करून घेतली.
या घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) शिरीष ओमने, स्थानिक गुन्हे शाखेचे किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक व्हॅन, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खैरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, कोल्हे, दिवटे, गायकवाड आणि बर्डे अधिक तपास करीत आहेत.





