पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
सुपा येथे रविवारी (दि. 1 नोव्हेंबर) रात्री दोन वाहनांना कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पिस्तुलाने हवेत गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी चंद्रकांत किसन जाधव आणि योगेश पवळे यांनी एकमेकांविरुद्ध फिर्यादी दिल्या आहेत. चंद्रकांत जाधव यांच्या फिर्यादीनुसार, रात्री सातच्या सुमारास अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील आनंद बेकरीजवळ कार पार्किंगमध्ये वळवत असताना लाल रंगाच्या स्विफ्ट कारचालकाने मागून कट मारून शिवीगाळ केली.
त्यानंतर बालाजी बेकर्समध्ये 10 ते 15 जणांनी एकत्र येऊन कारला धडक दिल्याचा आरोप करत त्यांच्या अंगावर धाव घेतली. त्यामुळे घाबरून स्वतःच्या संरक्षणासाठी परवानाधारक पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी योगेश पवळे, विकास म्हस्के, लवअंकुश, अक्षय थोरात आणि अन्य पाच ते सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. योगेश पवळे (रा. पिंपळगाव कौडा) यांच्या फिर्यादीनुसार, रात्री सातच्या सुमारास एक व्यक्ती त्यांच्या आनंद बेकरीत आली. त्यानंतर चंद्रकांत जाधवही तेथे आले.
भांडण करू नका, असे सांगून दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. रात्री 8.15 ते 8.30 च्या सुमारास जाधव पाच ते सहा जणांसह पुन्हा आले. त्यांनी बेकरीतील चित्रण पाहिल्यानंतर सोबतच्या व्यक्तींनी वाद घातला. यावेळी चंद्रकांत जाधव यांनी पिस्तुलातून बेकरीबाहेर हवेत गोळीबार केल्याचा आरोप पवळे यांनी केला आहे. सुपा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या फिर्यादींवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.




