Sunday, September 29, 2024
Homeधुळेहरण्यामाळजवळील लुटीचा २४ तासात लागला छडा

हरण्यामाळजवळील लुटीचा २४ तासात लागला छडा

धुळे | प्रतिनिधी Dhule

तालुक्यातील हरण्यामाळ परिसरातील लुटीच्या गुन्ह्याचा तालुका पोलिसांनी चोविस तासांच्या आत छडा लावला. तरूणाला लुटणार्‍या तिघांपैकी एकाला पोलिसांनी (police) जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ४३ हजारांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. संशयीत आरोपीने आर्वीतील लुटीचीही कबुली दिला आहे. या कामगिरीचे पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदेत विशेष कौतूक केले.

- Advertisement -

धुळे तालुक्यातील मुकटी येथील अमोल दिनकर पाटील हा तरूण दि.२० जून रोजी दुपारी दीड ते दोन वाजे दरम्यान हरण्यामाळ परिसरात फिरण्यासाठी आला होता. त्यादरम्यान तीन जणांनी त्यास अडवून मारहाण करीत त्यांच्याकडील एक हजाराच्या रोकडसह मोबाईल व आईचे मोडीत देण्याकरीता आणलेले सोन्याचे दागिने असा एकूण ४३ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला.

याप्रकरणी अमोल पाटील याच्या तक्रारीनुसार धुळे तालुका पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तपासाची चक्रे गतिमान करीत फिर्यादीने दिलेल्या वर्णनाप्रमाणे व गुप्त माहितीच्या आधारे विशाल वामन मालचे (वय २३ रा.नगावबारी) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा अजय जोंधळे (वय २३) व ज्ञानेश्‍वर ऊर्फ नुपेंद्र विश्‍वनाथ गोसावी (वय २५) दोघे रा.पाण्याच्या टाकीजवळ, नगावबारी, धुळे यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील ४३ हजार रूपयांचा मुद्देमाल काढून दिला. पुढील तपास महिला पोउनि राजश्री पाटील या करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील पोउनि.अनिल महाजन, महिला पोउनि.राजश्री पाटील, पोकॉ. राकेश मोरे, रविंद्र सोनवणे, अमोल कापसे, कुणाल शिंगाणे, धिरज सांगळे, कांतीलाल शिरसाठ, प्रमोद पाटील, नितीन दिवसे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या