Saturday, May 2, 2026
HomeनगरAhilyanagar : पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात रॉकेल स्टोव्हचा शोध

Ahilyanagar : पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात रॉकेल स्टोव्हचा शोध

सरकारच्या आदेशानुसार पूरवठा विभागाकडून जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तुमच्या घरात स्टोव्ह आहे का? तसेच रॉकेल वापरण्याची उपकरणे कोणती आहेत? याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. प्राधान्य कुटुंबातील, तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांकडून ही माहिती संकलित करण्यात येत असून उद्या सोमवार (दि. 23) रोजी ही माहिती राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

- Advertisement -

सध्या शहरातील कुटुंबांना गॅस सिलिंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची तर ग्रामीणमधील कुटुंबांना 45 दिवसांची मर्यादा घालण्यात आली आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अंत्योदय व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना रॉकेल दिले जाणार आहे. जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने जिल्ह्यात साडेसात लाख लाभार्थी अंत्योदय व प्राधान्यक्रमातील असल्याची माहिती देखील स्वतंत्रपणे शासनाला कळविली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सर्व गॅस एजन्सींसमोर सध्या ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याने उद्योजकांची अडचण वाढली आहे.

दुसरीकडे घरगुती गॅसचा वापर व्यावसायिकांकडून सुरू आहे. भविष्यात अशीच गॅस टंचाई उद्भवल्यास आपत्कालीन परिस्थितीत केरोसिनचा वापर करता येईल का, याचा शासनाकडून विचार सुरू आहे. सध्या मार्केटमध्ये रॉकेलचे स्टोव्ह अत्यंत दुर्मिळ झाल्याचे दिसून येते. शासनाने राबवलेल्या धूर मुक्त अभियानात या स्टोव्हची निर्मिती आणि वापर जवळपास बंद झाला आहे. स्वयंपाकासाठी इलेट्रॉनिक शेगडी, इंडक्शन कॉइल, एलपीजी गॅस शेगडी आदी उपकरणे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, युध्दामुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याने आता शासनाकडून स्टोव्ह सर्वेक्षणासंदर्भात पुरवठा विभागाला आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पूरवठा विभागाने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना सूचना देत शनिवारपासून सर्वेक्षण सुरु झाले आहे. दरम्यान, गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून लाभार्थ्यांना प्रति कुटुंब पाच लिटर रॉकेल दिले जाणार असल्याचे नियोजन आहे.

साठवणूक, वाहतूक होईल; परवान्याचे काय ?
जिल्ह्यात दहा वर्षे किंवा त्यापूर्वीच्या रॉकेल विक्री करणार्‍या घाऊक विक्रेत्यांनी पुन्हा रॉकेल विक्री करण्यास नकार दिला आहे. मात्र, जिल्ह्यातील धान्यांची वाहतूक करणार्‍या ठेकेदाराने रॉकेलच्या वाहतूक करण्यास संमती दर्शवली असली तरी ही वाहतूक करण्यासाठी त्यांना परवाना कोण आणि कसा देणार? रॉकेल ज्वलनशील पदार्थ असल्याने त्यासाठी वाहतूक परवाना आवश्यक राहणार आहे.

पहिल्याच दिवशी नकार
दरम्यान, पुरवठा विभागाने पहिल्याच दिवशी केलेल्या सर्वेक्षणात कोपरगाव आणि श्रीगोंदा तालुक्यात एकही स्टोव्ह नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नगर तालुक्यात व शहरात दुकानादारांकडे विक्रीसाठी स्टोव्ह नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षापासून कंपन्यांनी स्टोव्हचे उत्पादन बंद केल्याचे सांगण्यात आले. यामुळे सोमवारी होणार्‍या ऑनलाईन बैठकीत जिल्ह्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहे.

रॉकेल अन् उपकरणे
जिल्ह्यात रॉकेलचे वितरण केल्यास रॉकेलचा स्वयंपाकासाठी वापर करण्यासाठी स्टोव्ह अथवा इतर उपकरणे नागरिकांच्या घरात अथवा स्थानिक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत का? रॉकेल उपलब्ध केल्यास लाभार्थी त्याचा वापर करण्यास तयार आहेत का? याची खातरजमा सुरू आहे. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबे व अंत्योदय योजनेचे साडेसात लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची माहिती व रॉकेलचे वितरणाबाबतचा अहवाल शासनाला सादर केला आहे. आता शासनाकडून स्टोव्हसंदर्भात सर्वेक्षणाचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण सुरू केले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली.

ताज्या बातम्या

तुमच्याही फोनमध्ये अचानक वाजू लागला सायरन? घाबरू नका, जाणून घ्या नेमकं...

0
दिल्ली । Delhi आज सकाळी ठीक ११ वाजून ४० मिनिटांनी संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली. ऑफिसमध्ये कामात मग्न असलेले कर्मचारी असोत, बाजारात खरेदीसाठी गेलेले ग्राहक...