Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यागुजरात मधील शेतकऱ्यांचा माती वाचवा मोहिमेला पाठिंबा

गुजरात मधील शेतकऱ्यांचा माती वाचवा मोहिमेला पाठिंबा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आशियातील सर्वात मोठ्या दूध उत्पादकांपैकी एक असलेल्या बनास डेअरीने पालनपूर, गुजरात (Banas Dairy, Palanpur ) येथील एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले, जिथे त्यांनी माती वाचवा मोहिमे ( Save Soil Campaign )बद्दल उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले. गुजरातचे गृहमंत्री श्री. हर्ष रमेश सांघवी आणि बनास डेअरी प्लांटचे चेअरमन शंकरभाई एल चौधरी यांनी सद्गुरूंचे ( Shri Sadguru) या कार्यक्रमात स्वागत केले, जो आत्तापर्यंतचा सर्वात मोठा माती वाचवा कार्यक्रम होता.

- Advertisement -

कार्यक्रमात बोलताना सद्गुरूंनी आठवण करून दिली की, “माती वाचवा सारखी मोहीम आज गरजेची आहे कारण, ती पवित्र माती, जी इतकी जिवंत आहे, ज्यामुळे ही संपूर्ण सभ्यता निर्माण झाली आहे, ती आता अशा पातळीला निकृष्ट होत चालली आहे, जिथे भारताच्या 62% भूमीला नापीक मानले जात आहे.” जगभरात त्यांच्या यशस्वी व्यवसायांबद्दल सद्गुरूंनी गुजरातच्या लोकांचे कौतुक केले, पण अशी चिंता ही व्यक्त केली की, आपण कितीही पैसे कमावले, तरी खाण्यासाठी आपल्याला निरोगी मातीचीच गरज आहे.

सद्गुरूंनी आजच्या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले, जिथे आपण ट्रॅक्टर आणि मशीनने शेती करत आहोत, पण पालापाचोळा किंवा प्राण्यांच्या विष्ठेचा वापर करत नाही, ह्याशिवाय माती कधीही समृद्ध होऊ शकत नाही. जनावरांचे मूल्य हे केवळ त्यांनी उत्पादित केलेल्या दुधात नाही, तर शेणाच्या रूपात प्राण्यांची विष्ठाही शेती जिवंत ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्राण्यांना एक समस्या मानले जाते, याबद्दल चिंता व्यक्त करून, त्यांनी गुजरातच्या लोकांना या वृत्तीबद्दल सावध केले आणि त्यांना आठवण करून दिली की, आणखी 10-15 वर्षांच्या कालावधीत, “आपल्या प्राण्यांची संख्या 50% कमी झाली, तर आपण देशाची हत्या करत आहोत. ज्या दिवशी आपण या भूमीवर आपले प्राणी गमावू, त्या दिवशी आपण मातीची हत्या करत आहोत.”

हा कार्यक्रम एक ऐतिहासिक क्षण असल्याचे व्यक्त करून, बनास डेअरीचे एमडी संग्राम सिंह पुढे म्हणाले, “पृथ्वी मातेला जिवंत ठेवायचे असेल, तर या मिशनमध्ये आपण सर्वांनी सद्गुरूंना साथ दिली पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “मी तुम्हाला माझ्यासोबत ही शपथ घेण्यास आमंत्रित करतो की, आपण सर्व सद्गुरूंच्या या मिशनमध्ये सामील होऊ आणि पुढील पिढ्यांसाठी बनासची माती जिवंत ठेवण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करू. सद्गुरू, आम्ही बनासकांठाचे लोक, वचन देतो की, आम्ही या मातृभूमीला पुनरुज्जीवित करू.”

गुजरात राज्याचे गृहमंत्री हर्षभाई संघवी यांनी व्यक्त केले की, त्यांनी सद्गुरूंच्या नदी अभियानाच्या रॅलीने प्रेरित होऊन तापी नदी स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे.

सद्गुरू जे सध्या माती वाचवण्यासाठी 100 दिवसांच्या, 30,000 किमीच्या एकट्याने मोटारसायकल प्रवासावर आहेत, युरोप, मध्य आशिया, अरब राष्ट्रांमार्गे मातीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी 29 मे 2022 रोजी भारताच्या पश्चिम किनारी जामनगर शहरात पोहोचले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि सद्गुरू यांच्या उपस्थितीत ईशा आउटरीच सोबत ‘माती वाचवा’ सामंजस्य करार करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे.

सद्गुरू भारताच्या 9 राज्यांमध्ये प्रवास करतील आणि मातीसाठीचा त्यांचा ह्या प्रवासाचा शेवट ते कावेरी खोऱ्यात पूर्ण करतील, जिथे सद्गुरूंनी सुरू केलेल्या कावेरी कॉलिंग प्रकल्पाने 1,25,000 शेतकर्‍यांना माती आणि कावेरी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 62 दशलक्ष झाडे लावण्यास सक्षम केले आहे.

माती वाचवा मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट जगातील सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेतजमिनीत किमान 3-6% सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी प्रेरित करणे आहे.

भारतामध्ये, शेतजमिनीवरच्या मातीत सरासरी सेंद्रिय सामग्री 0.68% असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे देशाला वाळवंटीकरण आणि माती नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. देशातील सुमारे 30% सुपीक माती आधीच नापीक बनली आहे आणि उत्पादन देण्यास असमर्थ आहे.

युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD), युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP), यूएन वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे माती वाचवा मोहमेला पाठिंबा आहे. सद्गुरूंनी आपला प्रवास सुरू केल्यापासून, जगभरातील ७४ राष्ट्रांनी आपापल्या देशांतील माती वाचवण्यासाठी ठोस कृती करण्याचे वचन दिले आहे.

माती वाचवा, ही माती आणि ही धरती वाचविण्यासाठी एक सजग दृष्टीकोणाची प्रेरणा देणारी जागतिक चळवळ आहे. ही पहिली आणि अग्रगण्य अशी लोक चळवळ आहे. जगातील ३.५ अब्ज लोकांचा पाठींबा मिळवून (जगात मतदानाचा अधिकार असणाऱ्या ६०% लोकसंख्येपेक्षा जास्त) जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जागतिक नेते, प्रभावशाली व्यक्ती, कलाकार, शेतकरी, तज्ञ, आध्यात्मिक नेते, NGOs आणि सामान्य जनता, हे पुढे येऊन माती सोबत मानवतेचा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या मोहिमेला पाठींबा देत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या