नवी दिल्ली | New Delhi
मध्य प्रदेश सरकारचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कुंवर विजय शाह (Vijay Shah) यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यानंतर मंत्री शाह यांच्याविरोधात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने शाह यांच्या विधानाची स्वत:हून दखल घेत हे निर्देश दिले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय शाह यांना म्हणाले की, “तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठल्या प्रकारची वक्तव्यं करता. मंत्री असल्याने कसंही बोलणार का? ही कोणती भाषा आहे? असली वक्तव्ये मंत्र्याला शोभतात का? संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून असं वक्तव्य कसं करू शकतो, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी मंत्री कुंवर विजय शाह यांना फटकारले. तसेच पदावर असल्याने जबाबदारीने विधाने करावी, असा सल्लाही त्यांना दिला.
दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेल्या एफआयआरच्या (FIR) आदेशाला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. यानंतर आता या प्रकरणात (Case) सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे. तसेच शाह यांच्या वतीने वकील विभा दत्ता मखीजा यांनी युक्तिवाद केला. त्यांनी म्हटले की, याचिकाकर्त्याने आपली चूक मान्य केली असून,माध्यमांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केला. माध्यमांनी ते अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने सादर केले, असे त्यांनी सांगितले.