नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्रात पहिल्यांदाच नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये अभुतपूर्व गोंधळ दिसून आला. एकीकडे दुबार मतदार आणि आरक्षण मर्यादेमुळे निवडणूक वादात राहिली. त्यातच ऐन मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने नगरपरिषदेची मतमोजणीही २१ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय दिला. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेत स्पष्ट आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने सांगितले. कोणत्याही परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेवरील अनिश्चिततेला पूर्णविराम दिला.
सर्व निवडणुका ३१ जानेवारीपूर्वीच घ्याव्या
सरन्यायाधीश सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मतमोजमीच्या विषयासंदर्भात सुनावणी पार पाडली. यावेळी खंडपीठाने निवडणुकांचा जो कालावधी निश्चित केला आहे. त्याच्या आत म्हणजेच ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोणत्याही कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होऊ नये, असेही खंडपीठाने सांगितले.
२१ डिसेंबरलाच मतमोजणी होणार
२ डिसेंबरला झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले. २१ तारखेपूर्वी मतमोजणी घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. उच्च न्यायालयांमधील विविध याचिकांचा, प्रकरणांचा किंवा खंडपीठांच्या आदेशांचा परिणाम होऊन निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नागपूर, औरंगाबाद खंडपीठ किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल, त्यांच्या कोणत्याही आदेशाचा परिणाम निवडणुका लांबण्यावर होऊ नये, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.
सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




