नवी दिल्ली | New Delhi
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसंबंधीच्या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाकडून व्हीव्हीपॅट आणि प्रत्यक्ष मतदानाची शंभर टक्के पडताळणी करण्याच्या मागणीवरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या (Loksabha) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या (Voting) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायाधीशांकडून सांगण्यात आले आहे.
न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने १८ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत ईव्हीएम (Electronic Voting Machines) आणि व्हीव्हीपॅटसह (Voter Verified Paper Audit Trails) ईव्हीएम वापरून केलेल्या मतांचे संपूर्ण क्रॉस-व्हेरिफिकेशन मागणाऱ्या याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. यापूर्वी न्यायालयाने स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे देखील म्हटले होते. मात्र, ईव्हीएम वापरलेल्या मतांचे संपूर्ण क्रॉस-व्हेरिफिकेशन मागणाऱ्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आता हा आदेश दिला आहे.
यावेळी न्यायाधीश दत्ता म्हणाले की, व्हीव्हीपॅट संदर्भात अजूनही एकही तक्रार समोर आलेली नाही. आम्ही संशयाच्या आधारावर काही आदेश देऊ शकत नाही. तुम्ही ज्या रिपोर्टचा आधार घेत आहात, त्यामध्येही आतापर्यंत हँकिंगची कोणतीही घटना घडलेली नाही. त्यामुळे आम्ही दुसऱ्या संविधानिक संस्थेला नियंत्रित करू शकत नाही. आम्ही निवडणुकीला नियंत्रित करू शकत नाही. पंरतु, व्हीव्हीपॅटमध्ये काही सुधारणांची गरज असेल तर आम्ही ती करू, असे त्यांनी म्हटले.
तसेच न्यायाधीश खन्ना यांनी म्हटले की, न्यायालयाने (Court) दोन वेळा या प्रकरणात हस्तक्षेप केला. पहिल्या वेळी आम्ही व्हीव्हीपीएटी वापरणे अनिवार्य केले आणि दुसऱ्या वेळी आम्ही पडताळणी एक वरून पाच टक्क्यांपर्यंत वाढवली. मात्र, जर सुधारणेला वाव असेल तरच आम्ही त्यात वाढ करू शकतो. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार फ्लॅश मेमरीमध्ये कोणताही दुसरा प्रोग्राम फीड केला जाऊ शकत नाही. त्यामध्ये केवळ निवडणूक चिन्ह अपलोड केली जातात. तांत्रिक बाबींबाबत आम्हाला आयोगावर विश्वास ठेवावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी न्यायालयाने मायक्रो कंट्रोलर हे उपकरण कंट्रोल युनिटमध्ये असते की व्हीव्हीपॅटमध्ये, मायक्रो कंट्रोलरमध्ये एकदाच सर्व माहिती सेट केली जाते की त्यामध्ये पुन्हा बदल करता येतो, सिम्बॉल लोडिंग युनिट किती आहेत, मशिनमधील माहिती ३० की ४५ दिवस जतन केली जाते, ईव्हीएमच्या तिन्ही युनिट एकत्रित सील केल्या जातात की कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वेगळे ठेवले जाते, असेही प्रश्न उपस्थित केले.