नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आज सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देताना कान टोचले. लखनऊ कोर्टाने राहुल गांधी यांच्याविरोधात जारी केलेल्या समन्सवर स्थगिती दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि तुम्ही त्यांच्याबाबत असे वागत आहात! भविष्यात कधीही अशा प्रकारच्या टिप्पण्या करू नका, अन्यथा न्यायालय स्वतःहून त्याची दखल घेऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने खासदार राहुल गांधी यांना दिला आहे.
विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी १७ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे भारत जोडो यात्रा दरम्यान वीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यांनी सावरकरांना ‘ब्रिटिशांचा नोकर’ असे संबोधले होते. त्याशिवाय, सावरकरांना ब्रिटिश सरकारकडून पेन्शन मिळत असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी ‘माफी वीर’ अशी टिप्पणी केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
वास्तविक, मॅजिस्ट्रेट कोर्टाने या प्रकरणात राहुल गांधींविरुद्ध समन्स जारी केले होते. या समन्सच्या विरोधात राहुल गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, अलाहाबाद उच्च न्यायालयाने समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. यानंतर राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
कोणालाही चिथावणी देण्याचा हेतू नव्हता
राहुल गांधींच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, त्यांच्या अशिलाचा कोणालाही चिथावणी देण्याचा हेतू नव्हता. यावर न्यायालयाने म्हटले की, जर त्यांना कोणालाही चिथावणी द्यायची नव्हती तर त्यांनी अशी विधाने का केली. स्वातंत्र्यसैनिकांबद्दल खोटी विधाने करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा सक्त सल्ला कोर्टाने राहुल गांधींना दिला आहे. त्यांनी राहुल गांधींना सांगितले की ते राजकारणी आहेत, मग ते अशी विधाने का करतात, असे करू नका.
महाराष्ट्रात असे विधान केले, तिथे लोक त्यांची पूजा करतात
जर भविष्यात त्यांनी पुन्हा असे विधान केले तर कोर्ट त्या विधानाची दखल घेईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने म्हटले की, ‘तुम्ही महाराष्ट्रात असे विधान केले. तिथे लोक त्यांची पूजा करतात. तुमच्या आजीनेही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. महात्मा गांधी जेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यांना पत्रे पाठवत असत तेव्हा ते लिहित असत, तुमचा विश्वासू सेवक. त्यामुळे तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणणार का? असा खडा सवाल विचारत करत स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणे चुकीचे आहे असे म्हंटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने लखनऊ कोर्टाच्या समन्सवर तात्पुरती स्थगिती दिली, पण याच वेळी कठोर इशारा दिला. ‘कोणालाही स्वातंत्र्यसैनिकांविषयी चुकीची वक्तव्ये करण्याचा अधिकार नाही, असेही सुप्रीम कोर्टाने बजावले. “जर भविष्यात पुन्हा असे वक्तव्य केले गेले, तर कोर्ट स्वत:हून याची दखल घेईल असा इशारा देताना राहुल गांधी यांना स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान न करण्याचा सल्ला दिला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा