मुंबई | Mumbai
शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई अजून संपलेली नसून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याचा अंतिम फैसला सुप्रीम कोर्टात होणे बाकी आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय पीठासमोर आज ही सुनावणी होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे तर लक्ष आहेच, पण देशाचेही लक्ष आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाचा निवाडा निवडणूक आयोगाला सोडवायचा होता. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय फेब्रुवारीत घेतला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने ११ मे रोजी निकाल दिला होता. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली होती.
शिंदे गटाने प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवड केली. मात्र ही निवड सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर असल्याचे म्हटलेय आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचीच निवड योग्य असल्याचे सांगत त्यांचाच व्हीप लागू होईल हेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
तिसरी महत्वाची बाब म्हणजे, निवडणूक आयोगाने निकाल देताना म्हटले की, शिंदेंनी ५५ पैकी ४० आमदार आणि १९ पैकी १२ खासदार असल्याचे सिद्ध केले. परिस्थिती आणि पुरावे याच्या आधारे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना देण्यात येत आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने याउलट निरीक्षण नोंदवले. लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या आधारे पक्ष ठरवला जावू शकत नाही. विधानसभेतले लोकप्रतिनिधी आणि पक्ष ही वेगवेगळी बाब आहे. पक्षाची घटना महत्वाची आहे असे सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलेय.
दरम्यान, आता सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच उद्धव ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली होती. पण तेव्हा त्यावर सुनावणी झाली नाही. आता १८ सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.