दिल्ली | Delhi
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनल हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी या चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP ची जाहिरात दाखवण्यास सुरुवात केली.
XRP क्रिप्टोकरन्सी ही अमेरिकेतील एका कंपनीने विकसित केली आहे. चॅनल हॅक केल्यानंतर हॅकर्सनी सुप्रीम कोर्टाचे नाव बदलले असून त्याच्या जागी Ripple असं नाव झळकावले आहे. या चॅनलवर सर्वोच्च न्यायालयाच्या व्हिडीओंच्या ऐवजी क्रिप्टोशी निगडीत व्हिडीओ दाखवले जात होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या युट्यूब चॅनेलवर नियमित सुनावणी होत असतात. काही काळापूर्वीच कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाचे युट्युब चॅनल नेमके कुठून हॅक करण्यात आलं, याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणाही या हल्ल्यामुळे सतर्क झाल्या असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नेमके काय झाले याबद्दल आम्हाला खात्री नाही. मात्र संकेतस्थळाशी छेडछाड झाल्याचे दिसून येत आहे. ते म्हणाले की, शुक्रवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ही समस्या उघडकीस आली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी टीमने एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) कडे ती सोडवण्यासाठी मदत मागितली आहे.