Wednesday, February 4, 2026
HomeराजकीयSupriya Sule : नगरपंचायत, नगरपरिषदांमधील पैशांचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंनी भाजपकडे दाखवलं...

Supriya Sule : नगरपंचायत, नगरपरिषदांमधील पैशांचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंनी भाजपकडे दाखवलं बोट

दिल्ली । Delhi

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाले असून, भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) इतका पैसा नेमका कुठून आला, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात केला. या निमित्ताने राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कथित गैरव्यवहाराचा विषय थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहात चर्चिला गेला.

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्रातील निवडणुकीच्या वातावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवता येते, मात्र महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्नी किंवा आईविरोधात निवडणूक लढणे शक्य नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत पैशांच्या थैल्या उघड झाल्याचे सांगत, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात नोटांचे बंडल असलेली रोकड सापडल्याचा उल्लेख केला. हा पैसा भाजपकडे नेमका कुठून आला, असा त्यांचा मुख्य प्रश्न होता.

YouTube video player

निवडणुका निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात पार पाडल्या जाव्यात, ही भारतीय संविधानाची आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात महायुतीचे २०० हून अधिक आमदार असतानाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. निवडणुकीच्या आरक्षणात गडबड झाली, ज्याबद्दलचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात गडबड झाली आणि अर्ज मागे घेण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाली,” असे त्यांनी नमूद केले.

निवडणुकांमध्ये पैसे वाटण्यात आल्याची कबुली सत्ताधारी शिवसेनेच्याच एका आमदाराने दिली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरातून रोकड जप्त होण्याची ही एकच घटना नसून, अशा किमान दहा घटना त्या मोजून दाखवू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व घटनांवर निवडणूक आयोग कुठे आहे, असा सवाल करत, “महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे की नाही? आणि जर असेल, तर त्यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासात एवढा मारहाण आणि हिंसाचार कधीही झाला नव्हता, असे सुळे यांनी म्हटले. गाड्यांची तोडफोड करण्यात आली, लोकांना मारहाण झाली. एवढेच नाही, तर ईव्हीएम ठेवलेल्या ‘स्ट्राँग रूम’चेही कुलूप तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सभागृहात दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हटले की, पंतप्रधान दिल्लीतून एक भूमिका मांडतात, पण महाराष्ट्रात त्यांचेच सरकार त्याच्या अगदी विरुद्ध वागताना दिसत आहे. पंतप्रधानांनी जेव्हा नोटबंदी केली, तेव्हा देशातील काळा पैसा संपेल, असे सांगितले होते. मात्र, नोटबंदीनंतर सामान्य माणसाकडे रोख पैसे राहिलेले नाहीत, तर सगळी रोकड भाजपकडे जमा झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत पैसे बॅगेत नव्हे, तर मोठमोठ्या सुटकेसमध्ये आढळून आले, याचे व्हिडिओही समोर आले आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी सरकार कधी करणार आहे, असा थेट आणि महत्त्वपूर्ण सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपस्थित केला.

ताज्या बातम्या

Malegaon MC Politics : महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना-एमआयएमची उडी; नाट्यमयरित्या अर्ज...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी (Mayor and Deputy Mayor Election) काल (मंगळवारी) अंतिम मुदतीत शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी तर एमआयएम पक्षाने उपमहापौर...