मुंबई । Mumbai
राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे फुटलेली राष्ट्रवादी एकत्र येणार का (NCP Alliance) यावरही चर्चा केली जात आहे. काही ना काही निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे सातत्याने भेटताना दिसत आहे. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रितिक्रिया दिली आहे.
सोमवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पुणे येथे एक बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये साखर उद्योगाविषयी चर्चा झाली. ऊस शेती आणि साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमता (AI) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापरावर चर्चा झाली. या बैठकीनंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांना या भेटीविषयी विचारले असता, कामाच्या निमित्ताने अशा भेटी होत असतात असे उत्तर त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. राज्यात गुन्हेगारी वाढल्याबाबत आपण अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत असल्याचे ते म्हणाले. राज्यात पाण्याची समस्या वाढली आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे त्या म्हणाल्या.