Tuesday, November 26, 2024
Homeअग्रलेखसर्वेक्षण झाले, निष्कर्षही समजले, पुढे काय?

सर्वेक्षण झाले, निष्कर्षही समजले, पुढे काय?

करोना काळात शिक्षणक्षेत्राची विस्कटलेली घडी अद्यापही पुर्णपणे रुळावर आलेली नाही. सप्टेंबर महिना संपत आला आहे. जुन्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेतली जायची. पहिले शैक्षणिक सत्र संपायचे. पण चालू वर्षात सप्टेंबर महिना संपत आला तरी अकरावी प्रवेशाची विशेष फेरी अजुनही सुरुच आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कला शाखेच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत चालणार असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. काही विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. पण परीक्षांचे निकाल कधी लागतील याविषयी त्यांच्या मनात धाकधुक आहे. बिघडलेल्या शैक्षणिक वेळापत्रकाचा ताण शिक्षक आणि प्राध्यापकांवरही आला आहे. उपलब्ध वेळेत वर्षभराचा अभ्यास पूर्ण कसा करायचा या प्रश्नाने त्यांना सतावल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. काही विद्याशाखांचे वेळापत्रक सुरळीत झाले असल्याचे सांगितले जाते. तथापि करोनाची दोन वर्षे फारसे काही न शिकता आपण पुढच्या वर्गात गेलो आहोत ही भावना विद्यार्थी बोलून दाखवतात.

- Advertisement -

करोनाच्या दोन वर्षांमध्ये प्रात्यक्षिकाद्वारे शिकणे घडलेच नाही. त्याचा शैक्षणिक भवितव्यावर विपरित परिणाम होण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करतात. करोनानंतरच्या काळात अभ्यास, परीक्षा आणि निकाल या मुद्यांवर विद्यार्थी किती अस्वस्थ आहेत त्याचेच प्रतिबिंब नुकत्यात पार पडलेल्या एका सर्वेक्षणात उमटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने  विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंधित सर्वेक्षण केले. सहावी ते बारावी या इयत्तांमधील साधारणत: चार लाख विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी झाले होते.

अभ्यास, परीक्षा आणि त्यांचे निकाल याविषयी 80 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी अस्वस्थ असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षण अहवालात नमूद आहे. 51 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकण्यात अडचणी आल्या. स्वओळखीत अडचणी, नात्यांविषयी संवेदनशीलता वाढणे, परीक्षेचे दडपण, भविष्यातील प्रवेशाविषयी अनिश्चितता आणि एकाग्रतेचा अभाव या समस्यांनीही विद्यार्थी अस्वस्थ असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर करोनाचे दीर्घकालीन परिणाम होतील अशी भीती करोनाकाळात अनेक शिक्षणतज्ञ व्यक्त करत होते.

दीर्घकालीन परिणाम जाणवण्यासाठी काही काळ जावा लागेल याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांची भीती काही प्रमाणात खरी ठरली असावी का? दोन वर्षे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊ शकले नव्हते. या काळात त्यांचे काही प्रमाणात शिकणे झाले पण विविध प्रकारच्या शैक्षणिक व सामाजिक कौशल्यांचा विकास मात्र थांबला होता. कदाचित राहिलेला अभ्यास भरुन काढता येऊ शकेल पण कौशल्यविकासाची कमतरता भरुन काढण्याबाबत शिक्षणतज्ञही साशंक होते. हे फारसे आशादायक चित्र नाही. काही विद्यार्थी अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी योगाचा आधार घेतात.

काही विद्यार्थी प्रयोगवही लिहितात असे या सर्वेक्षणात नमूद आहे. पण त्यांचे प्रमाण किती असू शकेल? लाखो विद्यार्थ्यांचे काय? त्यांना सवार्र्ंनाच अशी मदत मिळण्याची शक्यता नाही. हा गंभीर विषय आहे. तो तितक्याच गंभीरपणे घेतला जायला हवा. एका पिढीचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे. केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर देशाचे सुद्धा. सर्वेक्षण झाले. त्याचे निष्कर्ष समोर आले. तेवढेच पुरेसे आहे का? निष्कर्षांचा आणि त्यावरच्या उपाययोजनांचा गांभिर्याने विचार केला जायला हवा. तसे झाले नाही तर विद्यार्थ्यांच्या एका पिढीचे नुकसान करायला शासनाची अनास्था कारणीभूत ठरु शकेल आणि तसे होणे सर्वार्थाने परवडणारे  नाही. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या