मुंबई –
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जाची
सुनावणी हायकोर्टाने 29 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे रियाचा आणि तिच्या भावाचा भायखाळा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
नोर्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं (एनसीबी) 8 सप्टेंबरला रियाला अटक केल्यानंतर तिला एनडीपीसी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार, 22 सप्टेंबरला तिची कोठडीची मुदत संपणार असल्याने जामिनासाठी रिया आणि तिच्या भावाने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने या दोघांना दिलासा न देता त्यांची कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली. दरम्यान, एनडीपीसी कोर्टाच्या या आदेशाविरोधात रिया आणि तिच्या भावाने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टात त्यांच्या याचिकेवर 23 सप्टेंबरला सुनावणी होणार होती मात्र, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोर्टाने सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे त्याच्या याचिकेवर गुरुवारी (24 सप्टेंबर) सुनावणी होणार होती.