मुंबई –
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोणची शनिवारी साडेपाच तास चौकशी
केली. ड्रग्जसंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅट केलं मात्र ड्रग्ज घेतलं नसल्याचे चौकशीदरम्यान दीपिकानं सांगितलं. दीपिका समाधानकारक उत्तर देत नसल्याची माहिती एनसीबी सूत्रांनी दिली आहे. सारा अली खान आणि श्रद्धा कपूरनेही ड्रग्ज घेतलं नसल्याचे सांगितले आहे.
एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहेत. त्यापैकी दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी बोलावलं होतं. ड्रग्जबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.
दरम्यान, दीपिका पादुकोण निर्धारित वेळेआधी दहा मिनिटं एनसीबी कार्यालयात पोहोचली. पत्रकारांचा फेरा चुकवण्यासाठी अलिशान वाहनांमधून फिरणारी दीपिका साध्या कारने आली.
निर्माता क्षितीज प्रसादला अटक
बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने धर्मा प्रोडक्शन्सचा संचालक निर्माता क्षितीज प्रसाद याला अटक केली आहे. एनसीबीच्या टीमने क्षितीजला शुक्रवारी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यानंतर रात्री त्याला ताब्यात घेण्यात आलं. जवळपास 27 तास चौकशी केल्यानंतर त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने अखेर क्षितीजला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.