Saturday, July 13, 2024
Homeमुख्य बातम्या“ठिकाण आणि वेळ तुम्ही ठरवा, मी नि:शस्त्र...”; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज

“ठिकाण आणि वेळ तुम्ही ठरवा, मी नि:शस्त्र…”; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मनसे आणि शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात नेहमीच या ना त्या मुद्द्यावरुन वाद होत असतो. आता, दोन्ही पक्षाच्या महिला नेत्या भिडल्याचे दिसून येते. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेनंतर मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी त्यांना थेट इशाराच दिला होता. मनसेच्या इशाऱ्यानंतर आता सुषमा अंधारे यांनीही ओपन चॅलेंज दिलं आहे. ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी निशस्त्र यायला तयार आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी मनसेच्या नेत्यांना खुलं आव्हानचं दिल्याचं दिसून येत आहे.

डिजे, डॉल्बीच्या आवाजावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केले होते. त्यावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर नातवाचा उल्लेख करत टोला लगावला. एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली, त्याचा आपल्या नातवाला त्रास होतोय म्हणून बडा नेता भाष्य करेल. नेत्याच्या नातवाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, मात्र गोर गरिबाचे मुलही चांगले राहिलं पाहिजे असं सुषमा अंधारेंनी म्हटलं होते. त्यावरून आता मनसेने संतप्त इशारा दिला होता. त्यामुळे, आता सुषमा अंधारे यांनी मनसेचं चॅलेंज स्वीकारत नाव न घेता, ताई कुठं आणि कधी यायचं ते सांगा, असंच म्हटल्याचं दिसून येतं.

सुषमा अंधारेंचं ट्वीट

“भडकले..गुर्गुरले..dj…जाळ..डरकाळी..अरे बापरे..!बाई, ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे.” अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी शालिनी ठाकरेंना ओपन चॅलेंज केलंय. तसेच आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट शेअर करत पुढे त्यांनी लिहिलंय की, ” पण खरं सांगा, नांदेड आणि संभाजीनगरचे बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का? मी मुद्द्यावर बोलतेय, चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय?” असा खरमरीत सवाल विचारला आहे.

शालिनी ठाकरे यांचं पत्र काय?

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पत्र लिहित अंधारे बाई, यापुढे याद राखा असा इशारा दिला. या पत्रात म्हटलंय की, हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत, यासाठी राजसाहेबांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, काही हिंदू सणांमध्ये डिजे आणि लेझर शो मुळे होणारा त्रास याबाबत रोखठोक भूमिका घेऊन त्यास विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेने आणि सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी त्याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला रुचली नसल्याचे दिसतंय. सध्या मराठीबाबत तांडव सुरू असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगल बच्चे शांतच आहेत. अशावेळी फक्त मनसे आणि राजसाहेब सडेतोड भूमिका घेताना दिसतात. म्हणून राजसाहेबांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करतायेत असा आरोप शालिनी ठाकरे यांनी केला होता.

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी गट प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते मग तुमच्यासारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते. शिल्लक सेना प्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत. म्हणून आपण नैराश्येत आहात. यातूनच संबंध नसताना आपण नातवाला राजकारणाल ओढले. हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. याबाबत आपण खरेतर जाहीर माफी मागितली पाहिजे पण आमच्या देव, देवतांचा संतांचा अपमान करणाऱ्या तुम्ही त्यामुळे आपल्याकडून ही सुसंस्कृत अपेक्षा करणेच चूक आहे असंही शालिनी ठाकरे यांनी ठणकावले.

दरम्यान, आपल्याला ही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली तर तुमच्या मनाला रुचतील का? अंधारे बाई, यापुढे याद राखा, संबंध नसताना जर राजसाहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डिजे वाजवल्याशिवाय राहणार नाही. ज्या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा. मात्र विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा असा सल्लाही मनसेने सुषमा अंधारे यांना दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या