मुंबई । Mumbai
दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन विधिमंडळ सभागृहात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. विधानपरिषेदत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला, भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार चित्रा वाघ (Chitra wagh) यांचे नाव घेऊन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दिशा सालियन प्रकरण हे जाणीवपूर्वक ठाकरेंना बदनाम करण्याचा घाट असल्याचे महाविकास आघाडीतील आमदारांनी म्हटलं आहे. सभागृहात चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यातील वाद सोशल मीडियात चित्रा वाघ विरुद्ध सुषमा अंधारे यांच्यापर्यंत पोहोचला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी.. असे चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. दरम्यान चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, काल एक बाई विधान परिषदेत विचित्रपणे किंचाळत होती. अनेकजण म्हणाले की, त्या झोपडपट्टीतील भाषा वापरत होत्या. पण, झोपडपट्टीला देखील एक क्लास असतो. झोपडपट्टीतील लोकं आपले इमान विकत नाहीत. सभागृहात आणखी एक बाई होत्या, ज्यांना आम्हीच सदस्यत्व दिले. पण, जिकडे खावा तिकडे थवा असे त्यांचे काम आहे. या बायकांच्या आडून भाजप तिर मारत आहेत, म्हणून मी इथे उत्तर देत आहे. कधीकाळी या बाई पक्ष प्रवेशासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे लोळत आल्या होत्या. संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली असे त्यांचे म्हणणे असेल, तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री कसे?
सुषमा अंधारे यांनी यावेळी चित्रा वाघ यांचा उल्लेख वाघबाई असा केला. त्या म्हणाल्या, वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही. भाजप वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा कशा पद्धतीने करून घेत आहे ते दिसून येत आहे. वाघबाईंनी आकडा थोडा कमीच सांगितला. महाराष्ट्राची परंपरा फुले, शाहू आणि आंबेडकरांची आहे. राज्याच्या सभागृहाला मोठी परंपरा आहे. पण कालचा थयथयाट सभागृहाची प्रतिमा मलिन करणारा होता.
सुषमा अंधारे यांनी यावेळी नागपूर दंगलीतील अनेक आरोपी भाजपशी संबंधित असल्याचाही आरोप केला. नागपूर दंगलीतील काही आरोपी भाजपशी संबंधित आहे. त्याचे पुरावे आम्ही लवकरच जाहीर करू. नागपूर दंगल अंगाशी आली आहे, म्हणून भाजपने दिशा सालियन प्रकरण बाहेर काढले आहे. एखाद्याच्या दुःखाला आपले राजकारण करण्याचे नीच काम भाजपकडून होत आहे, असे त्या म्हणाल्या.