जळगाव । प्रतिनिधी jalgaon
जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करणार्या संशयीताला जिल्हापेठ पोलिसांनी एरंडोल येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी रिकव्हरी करण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चंद्रकांत रामदास साळुंखे (वय-42) रा.हिराशिवा कॉलनी, जळगाव असे अटकेतील संस्थेत आरोपीचे नाव आहे.
जिल्हा पेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा पेठ पोलिसांच्या हद्दीसह इतर ठिकाणी दुचाकीची चोरी केल्याचे प्रकार उघडकीला आले आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा शोधा घेत असतांना चंद्रकांत साळुंखे हाच दुचाकींची चोरी करत असल्याचे समोर आले. जिलहापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिक माहिती मिळविली असतांना संशयित आरोपी हा एरंडोल शहरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम तडवी, रवींद्र साबळे ,तुषार पाटील, महिला पोलीस नाईक भारती देशमुख यांनी संशयित आरोपी चंद्रकांत साळुंखे याला एरंडोल शहरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.