नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील बस सेवेमधील कर्मचारी राजेंद्र पाठक आणि वैभव कांबळे यांच्यावर करण्यात आलेली एकतर्फी निलंबनाची कारवाई अखेर रद्द करण्यात आली. ही कारवाई अन्यायकारक आणि सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप होत असल्याने, संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला.
या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कामगार मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे, शहराध्यक्ष हेमंत नेहेते यांच्यासह ईतर पदाधिकारी सक्रिय होते. त्यांच्या प्रयत्नामुळेच हा सकारात्मक निर्णय शक्य झाला.
या प्रकरणी वाहतूक नियंत्रक सोनवणे यांच्याशी परिवहन महामंडळाच्या कार्यालयात शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजपा कामगार मोर्चाचे पदाधिकारी, सेवाशक्ती कामगार युनियनचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही कर्मचाऱ्यांचे निलंबन अन्यायकारक असून ते तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. चर्चेअंती संबंधित अधिकाऱ्यांनी निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या सूडबुद्धीने होणाऱ्या कारवाया रोखण्यासाठी खबरदारी घेतली जाईल, अशी लेखी शाश्वती देण्यात आली.