अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
खंडाळा (ता. अहिल्यानगर) येथे एका महिलेला सून लपविल्याच्या संशयातून मारहाण करून तिच्याकडून दीड लाख रुपये व पाच तोळे सोन्याचे गंठण परत देण्याची मागणी करत धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल रावसाहेब काळदाते (वय 48, रा. खंडाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून योगीता शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शुभलक्ष्मी हॉटेलच्या पाठीमागे, नगर- दौंड रस्ता, हनुमाननगर, अहिल्यानगर) व इतर पाच अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
काळदाते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (23 मे) सायंकाळी 4.15 च्या सुमारास त्यांच्या घरी सयोगिता शिंदे व इतर पाच जणांनी येऊन त्यांच्या सूनबाई वनिता यांचा ठावठिकाणा विचारला. वनिता आठ दिवसांपूर्वी माहेरी गेली आहे असे फिर्यादीने सांगितले असता संतप्त झालेल्या संशयित आरोपींनी घरात घुसून सामानाची उचकापाचक केली. त्यानंतर त्यांनी सून वनिता हिच्या अंगावरील पाच तोळ्यांचे गंठण व दीड लाख रुपये आम्ही दिले आहेत, ते परत द्या, अशी मागणी केली.
फिर्यादी यांनी याबाबत कोणताही संबंध नसल्याचे सांगितले असता संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली व गंठण व पैसे परत दिले नाहीत, तर जीव घेऊ, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अंमलदार गांगुर्डे अधिक तपास करीत आहेत.