कोलकाता । Kolkata
पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे आणि ममता बॅनर्जी यांचा गड उद्ध्वस्त करणारे सुवेंद्रु अधिकारी आता मुख्यमंत्री होणार हे आता निश्चित झाले आहे. भाजपच्या बैठकीमध्ये गटनेतेपदी सुवेंद्रु अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली आहे. आतापर्यंतचे भाजपचे पश्चिम बंगालमधील हे सर्वात मोठे यश मानले जाते. अशामध्ये विजयानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आता याबाबत भाजपने स्पष्ट केले आहे की, सुवेंदू अधिकारीच भाजपकडून पश्चिम बंगलाचे पहिले मुख्यमंत्री बनतील.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थितीत होते. या बैठकीमध्ये सुवेंद्रु अधिकारी यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. खुद्द अमित शाह यांनी सुवेंद्रु अधिकारी हे बंगालचे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा केली.
यावेळी अमित शाह म्हणाले, काही दिवसांपूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जवळपास आठ प्रस्ताव मिळाले, त्यात एकच नाव होते. दुसऱ्या नावासाठी योग्य वेळ देण्यात आला मात्र दुसरे नाव आले नाही. यामुळे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून शुभेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगाल विधानमंडळाचे नेते म्हणून जाहीर केल्याचे अमित शाह यांनी जाहीर केले.
सुवेंदू अधिकारींसोबत दोन उपमुख्यमंत्री
सुवेंदू अधिकारी हे फक्त मुख्यमंत्रिपदच नव्हे तर गृह मंत्रालय देखील सांभाळतील अशी माहिती समोर आली आहे. तसेच, पश्चिम बंगालला दोन उपमुख्यमंत्री मिळणार असून त्यापैकी एक उपमुख्यमंत्रीपद हे प्रसिद्ध अभिनेत्री आणि नेत्या रूपा गांगुली यांचे नाव निश्चित झाले असल्याचे कळते. मंत्रिमंडळात समतोल ठेवण्यासाठी भाजपचे दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला निवडला असल्याचे सांगण्यात येत आहे. रूपा गांगुली यांच्यासोबतच दुसरा उपमुख्यमंत्री उत्तर बंगालमधील पुरुष लोकप्रतिनिधी असणार आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
मंत्रीमंडळात कोण असणार?
सुवेंद्रु अधिकारी यांच्या मंत्रिमंडळामध्ये आता कोण कोण असणार, याची चर्चा रंगली आहे. पण, या मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिला जाणार आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या रत्ना देबनाथ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. आरजी मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेची रत्नाा देबनाथ या आई आहे. या शिवाय भारत सेवाश्रम संघाचे संत राहिलेल उत्पल महाराज, माजी आयपीएस अधिकारी राजेश कुमारआणि माजी एनएसजी कमांडो दिपांजन चक्रवर्ती यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
कोण आहे सुवेंदू अधिकारी?
सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात पराभव केला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्यांनी नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जींना हरवले होते, आता सलग दुसऱ्यांदा त्यांनी हा पराक्रम गाजवला आहे. 2021 ते 2026 या काळात त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी तामलुकचे खासदार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले आहे. दरम्यान, निवडणूक झाल्यानंतर त्यांना सर्वात मोठा धक्का बसला होता. त्यांचे स्वीय्य सहायक चंद्रनाथ रथ यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.





