पुणे । Pune
स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपो घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. याच दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एसटी महामंडळात IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची घोषणा केली.शनिवारी झालेल्या महत्वाच्या बैठकीत सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तक्रार निवारण कक्ष आणि टोल-फ्री क्रमांक सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
एसटी स्थानकांमध्ये खासगी बसची घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, तसेच १५ एप्रिलपूर्वी जुन्या बसेस स्क्रॅप करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा निर्णय एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरणात अटक करण्यात आलेल्या नराधमाला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत (12 दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी दत्तात्रयने पिडीत तरुणीला ताई म्हणून बोलण्यास सुरूवात केली. कंडक्टर म्हणून तो पिडीत मुलीला बोलला व तिचा विश्वास संपादन केला. त्याने बस दाखवली व अनेक लोक बसमध्ये असल्याचे त्याने दाखविले. पण, बस पुर्ण रिकामी होती. पिडीत तरूणीने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तिने विनंती देखील केली. पण, आरोपीने मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला, असे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.