नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकच्या तन्वी चव्हाण-देवरे यांनी अविश्वसनीय साहस गाजवून इंग्लिश खाडी (इंग्लंड ते फ्रान्स, ४२ किमी अंतर) १७ तास ४२ मिनिटात यशस्वीरित्या पोहून इतिहास घडवला आहे. त्या इंग्लिश खाडी पोहणारी भारतातील पहिली माता बनण्याचा विक्रम स्थापित केला आहे.
या अद्भुत कामगिरी नंतर त्या मंगळवारी संध्याकाळी नाशिककमध्ये परतल्या त्यावेळी तन्वीचे यांचे नाशिकमध्ये पाथर्डी फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले. नाशिक सायकलिस्ट, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ऑफिस कर्मचाऱ्यांनी मिळून हा सोहळा आयोजित केला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने तन्वीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर खुली जीपमध्ये तन्वीची मिरवणूक काढण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर तन्वी यांच्या निवासस्थानी परिसरातील लोकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तन्वी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा प्रवास सोपा नव्हता, पण माझ्या कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्याने मी हे करू शकले. मला आशा आहे की मी इतर महिलांनाही प्रेरणा देईन आणि त्यांनाही आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करेन.”
तन्वी यांच्या या अद्भुत कामगिरीने नाशिककरांना अभिमान वाटला आहे. शहरातील अनेकांनी तन्वी यांचे कौतुक केले आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.