Monday, May 27, 2024
Homeनगरस्वाईन फ्लूची लक्षणे करोनासारखीच!

स्वाईन फ्लूची लक्षणे करोनासारखीच!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या भयंकर संसर्गाच्या आपत्तीनंतर जिल्ह्यात आता स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात स्वाईन फ्लूने शहरासह जिल्ह्यात 3 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूची सर्व लक्षणे करोनासारखीच आहेत, त्यामुळे सर्वांनी करोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 11 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून त्यातील संगमनेर, पारनेर व इतर एक असा तिघांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढण्यासह बळींचाही आकडा वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे ही सर्वसाधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधीकधी पोटदुखी आदी लक्षणांचा समावेश आहे.

ही सर्व लक्षणे करोनासारखीच आहेत. त्यामुळे करोनात जी खबरदारी घेतली, तशीच खबरदारी अशी लक्षणे जाणवल्यास घ्यावी. विशेष म्हणजे करोना लसीकरणाकडे नागरिकांनी सध्या पाठ फिरविली आहे. त्यामुळे हे लसीकरण करून घ्यावे. ज्यांचा पहिला डोस झाला असेल त्यांनी दुसरा व ज्यांचा दुसरा डोस झाला असेल त्यांनी बुस्टर डोस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

स्वाईन फ्ल्यूमध्ये लक्षणांवरून अ, ब, क अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे. वर्गवारी अ मध्ये सौम्य ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या अशी सौम्य लक्षणे असतात. यात स्वॅब घेण्याची गरज नाही. घरच्या घरी विलगीकरणात रहावे. 24 ते 28 तासानंतर लक्षणे वाढल्यास आसेलटॅमीवीर सुरू करावे. वर्गवारी ब मध्ये वरील लक्षणांशिवाय तीव्र घसादुखी, घशाला सूज, जास्त ताप येतो. यात निवडक अतिजोखमीच्या पेशन्टचा स्वॅब घ्यावा. तसेच आसेलटॅमीवीर सुरू करावी.

घरी विलगीकरणात अ‍ॅन्टीबायोटिकचा वापर करावा. वर्गवारी क नुसार धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे ही लक्षणे दिसतात. यात प्रत्येकाचा स्वॅब घेणे गरजेचे असते. शिवाय रूग्णास तातडीने रूग्णालयात भरती करावे. स्वॅब घ्यावा व प्रयोगशाला निदानाची वाट न पाहता आसेलटॅमीवीर सुरू करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ही घ्या काळजी

वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुणे. पौष्टिक आहार घेणे. लक्षणे असल्यास गर्दीत जाणे टाळणे, धूम्रपान टाळणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

स्वाईन फ्ल्यूची लक्षणे करोनासारखीच आहेत. त्यानुसार नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच ज्यांचे करोना लसीकरण बाकी असेल त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. सर्व शासकीय आरोग्य केंद्रांत ही लस मोफत उपलब्ध आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

– डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या