अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
येथील क्लेरा ब्रुस हायस्कुल मैदानावर अवैधरित्या तलवार घेऊन आलेल्या तरुणाला कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याविरूध्द आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण कृष्णा फसले (वय 30 रा. खिस्तगल्ली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
एक तरुण हा शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूल मैदानावर अवैधरित्या तलवार घेऊन येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन बातमीतील नमुद तरुणाला सापळा लावून शिताफीने पकडले.
त्याने त्याचे नाव करण कृष्णा फसले असे सांगितले. त्याच्या कब्जात एक तलवार मिळून आली आहे. पोलिसांनी ती जप्त केली आहे. सदरची कारवाई उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे.