अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
खोसपुरी (ता. अहिल्यानगर) शिवारातील जय भवानी कला केंद्र येथे नाचगाण्यावर पैसे लावण्याच्या वादातून दोन तरुणांवर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. अक्षय रामदास चेमटे (रा. घोडेगाव ता. नेवासा) व सचिन महादेव दराडे (रा. वंजारवाडी, ता. नेवासा) अशी हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
सदरची घटना सोमवारी (5 मे) रात्री 10.30 वाजेच्या सुमारास सोनई ते राहुरी रस्त्यावरील वंजारवाडी बसस्टँड परिसरात घडली असून हा वाद कला केंद्रातून सुरू झाला असल्याने जखमी अक्षय चेमटे यांच्या जबाबावरून बुधवारी (7 मे) रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी ही माहिती दिली. भरत पालवे (पूर्ण नाव माहिती नाही), विशाल भरत पालवे (दोघे रा. पांढरीपूल, वांजोळी, ता. नेवासा), सचिन साहेबराव डोळे (रा. डोळे वस्ती, वंजारवाडी, ता. नेवासा) व जय भवानी कला केंद्रातील अनोळखी चार महिलांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 मे रोजी रात्री जय भवानी कला केंद्र, खोसपुरी येथे फिर्यादी अक्षय चेमटे यांचा संशयित आरोपींसोबत नाचगाण्यावर पैसे लावण्यावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून संशयित आरोपींनी सोनई ते राहुरी रस्त्यावर वंजारवाडी बस स्टँण्ड परिसरात अक्षय चेमटे यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच सचिन दराडे यांना देखील संशयित आरोपींनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अक्षय चेमटे यांच्या जबाबावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत.
कला केंद्रात महिलेला मारहाण
दरम्यान, कला केंद्रात तिघांनी गोंधळ घालत मारहाण केल्याची तक्रार एका महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय रामदास चेमटे (रा. घोडेगाव ता. नेवासा), सचिन महादेव दराडे, आकाश मच्छिंद्र दराडे (दोघे रा. वंजारवाडी ता, नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, कला केंद्रातील महिलांनी बुधवारी पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.