Saturday, July 27, 2024
Homeनगरसंभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे

संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे

अहमदनगर (प्रतिनिधी)

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिले.

- Advertisement -

संभाव्य दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या बाबतीत करावयाच्या उपायोजनाबाबत सर्व यंत्रणांची संयुक्त आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह सर्व तालुक्याचे तहसिलदार, गटविकास, अधिकारी, संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकार्‍यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, चालू वर्षात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पाऊस न झाल्यास दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपायोजना कराव्यात. तालुकास्तरावर अधिकारी तसेच ग्रामस्तरावर काम करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बैठका घेऊन उपाययोजनांबाबत सुचना देण्यात याव्यात. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी मागणीप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे. पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असलेल्या जागांची माहिती अद्यावत करण्यात यावी. जिल्ह्यात येत्या दिवसांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सण शांततेत साजरे होतील तसेच या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या.

‘रोहयो’चे कामे मंजूर करा
मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात मंजुर करून घेण्यात यावीत. प्रत्येक गावात सार्वजनिक स्वरूपाची किमान पाच कामे मंजूर करून ठेवत सर्व यंत्रणांनी रोहयोची अधिकाधिक कामे सुरू करण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. जिल्ह्यात मागेल त्याला काम उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे अधिक प्रमाणात सेल्फवर मंजूर करून ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या