मुंबई | Mumbai
टी२० विश्वचषक स्पर्धेचे (T 20 World Cup) बिगुल वाजले असून आज रविवार २ जून रोजी सकाळी ६ वाजता अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडत आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. १४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आयसीसी इव्हेंट वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. यापूर्वी २०१० मध्ये येथे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या वर्ल्डकप स्पर्धेत काही गोष्टी पहिल्यांदाच होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. तसेच काही टीम पहिल्यांदाच टी२० वर्ल्डकप खेळत असून काही नियम पहिल्यांदाच लागू होत आहेत. टी २० वर्ल्डकप स्पर्धेला भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने झाली असून स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना २९ जूनला होणार आहे.
सामना बरोबरीत सुटला तर निकाल कसा लागेल?
स्पर्धेतील एखादा सामना बरोबरीत सुटला तर त्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये होईल. सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर परत सुपर ओव्हर होईल. एक तासाचा अतिरिक्त वेळ संपेपर्यंत सुपर ओव्हर चालेल. तरीही निकाल लागला नाही तर साखळी आणि सुपर ८ फेरीत दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाईल. जर उपांत्य फेरीत अशी स्थिती उद्भवली तर सुपर ८ फेरीत टॉपला असलेल्या संघाला पुढे संधी मिळेल.
पावसाचा व्यत्यय आला तर?
टी२० नियमानुसार, कोणत्याही सामन्याचा निकाल देण्यासाठी कमीत कमी ५ षटके होणं गरजेचं आहे. साखळी फेरी आणि सुपर ८ फेरीत हा नियम लागू असेल. सामना झालाच नाही तर गुण वाढून दिले जातील. पण उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी नियम वेगळा असेल.
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत कसा निर्णय असेल?
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा निकाल देण्यासाठी कमीत कमी १०-१० षटके होणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस आहे, त्यामुळे सामना दुसऱ्या दिवशी होईल. पण दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात असं होणार नाही. कारण एका दिवसाच्या अंतराने अंतिम सामना असेल. त्यामुळे राखीव दिवस नाही. पण त्याच दिवशी सामना संपवण्यासाठी ४ तास १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. पण तरीही निकाल लागला नाही, सुपर ८ मधील आघाडीच्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळेल, अंतिम फेरीसाठी ३० जून हा राखीव दिवस आहे. जर सामना झाला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
टीम इंडियाच्या गटात कोणते संघ आहेत?
भारत गट अ मध्ये असून यात अमेरिका, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा हे देश आहेत. तर टीम इंडियाचे ग्रुप स्टेज सामने भारतीय वेळेनुसार खेळले जातील.
वर्ल्डकप स्पर्धेत हा नियम पहिल्यांदाच असणार
वर्ल्डकप स्पर्धेत एक नियम नव्याने असणार आहे. स्पर्धा वेगाने पूर्ण होण्यासाठी स्टॉप क्लॉक हा नियम असणार आहे. यात एक षटक संपल्यानंतर दुसरं षटक सुरु करण्यासाठी अवघ्या ६० सेकंदाचा अवधी असेल. जर असं झालं नाही तर दोन वेळा वॉर्निंग दिली जाईल. पुन्हा तसंच केलं तर मात्र ५ धावा पेनल्टी म्हणून दिल्या जातील.
वर्ल्डकप स्पर्धेत एकूण किती संघ?
टी२० वर्ल्डकप स्पर्धेत एकूण २० संघ भाग घेणार आहे अमेरिकेत स्पर्धा असल्याने त्या संघाला स्पर्धेत स्थान मिळालं आहे कॅनडा, युगांडा पहिल्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळणार आहेत. तसेच भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, नेदरलैंड, स्कॉटलैंड, आयलँड, पापुआ न्यू गिनी, वेस्ट इंडिज, नामिबिया, अफगाणिस्तान आणि ओमान या स्पर्धेत आहेत.
वर्ल्डकप स्पर्धेचा फॉर्मेट कसा आहे?
वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरी आणि सुपर ८ फॉर्मेट आहे. २० संघांची विभागणी ५-५ च्या चार गटात केली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे २ संघ सुपर ८ फेरीत खेळतील, तेथे ४-४ वे दोन ग्रुप असतील. सुपर ८ मधील २-२ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि अंतिम सामना होईल.
वर्ल्डकप स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार?
अमेरिकेत न्यूयॉर्क, डलास आणि लॉडरहिलमध्ये साखळी फेरीतील सामने होतील. वेस्ट इंडिजमध्ये ब्रिजटाउन, प्रोविडेंस, नॉर्थ साउंड, ग्रोस आयलेट, किंग्सटन आणि टारोबामध्ये ग्रुप स्टेज, सुपर ८ सेमीफायनल आणि अंतिम सामना खेळला जाईल. अंतिम सामना ब्रिजटाउनमध्ये खेळला जाईल.
वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, खींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज