Saturday, November 2, 2024
Homeब्लॉगटाळ मृदुंग

टाळ मृदुंग

सलग दोन वर्षं आषाढातला टाळमृदुंगांचा गजर कानी पडला नाही. यंदा मृदुंगमणींनी मृदुंगाची ओढ काढून घेतली, शाई भरून आणली. वीणेच्या तारा बदलल्या गेल्या. वारकर्‍यांचे पांढरे स्वच्छ ठेवणीतले पोशाख दोन वर्षांनी ट्रंकेबाहेर पडले. तुळशी वृंदावनांना नवा रंग लागला आणि ती डोक्यावर घेऊन बायाबापड्या उत्साहानं घराबाहेर पडल्या. गेली दोन वर्षं ज्ञानेश्वर माउलींच्या आणि तुकोबारायांच्या पादुका बसमधून पंढरपूरला गेलेल्या, त्यामुळं यंदा पादुकांचा रथ ओढायचा मान मिळालेल्या बैलांची निबर कातडीही शहारून थरथरली..!

मृदुंगमणींनी धुमाला कणकेचा गोळा लावून सरपट वाजवली आणि विठ्ुमाऊलीचा गजर होऊन पालख्या मार्गस्थ झाल्या. दोन वर्षांच्या विरहामुळं विठ्ुमाऊलीच्या भेटीची ओढ जबरदस्त वाढलेली… टाळाचा ठेका धरून अभंग गात, नाचत, फुगड्या खेळत वैष्णवांचा मेळा पंढरपुराकडे निघाला… आता मार्गात छोट्या-मोठ्या दिंड्या येऊन मुख्य प्रवाहात मिसळणार आणि वारकर्‍यांची ही गर्दी महासागराचं रूप घेणार, तोच अचानक रडारवरून विमान गायब व्हावं किंवा एटीसीबरोबर असलेला विमानाचा संपर्क तुटावा, असं काहीतरी झालं. म्हणजे, वारी नेहमीच्याच उत्साहानं पुढे-पुढे जात राहिली; पण वारीचा टीआरपी अचानक कोसळला. ज्यांना पंढरीच्या वारीला जाता आलं नाही, त्यांचंही दरदिवशी पालखी कुठपर्यंत पोहोचली, याकडे लक्ष असतं. माध्यमांचे प्रतिनिधी वारीत साइड स्टोर्‍या शोधत असतात. त्या लगोलग छोट्या पडद्यावर येतात; पण यंदा तसं काहीच घडेना.

यंदा आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा कुणाच्या हस्ते होणार, याबाबतची बॅनरबाजी बघून वारकरी पुण्यातून बाहेर पडले आणि जणूकाही संपर्कक्षेत्राच्या बाहेरच गेले. विठ्ठलाचा आणि बडव्यांचा उल्लेखसुद्धा झाला; पण त्याचाही वारीशी अजिबात संबंध नव्हता. आताही कुठे-कुठे प्रचंड गर्दीत भगवी पताका नाचताना दिसतीये; पण त्या गर्दीचा आणि झेंड्यांचाही संबंध वारीशी नाही. तरीसुद्धा तीच गर्दी लोकांच्या आणि कॅमेर्‍यांच्यानजरेचा केंद्रबिंदू ठरतीये. गर्दीनं भरलेला दिव्याचा घाट यंदा दुर्लक्षितच राहिला.

- Advertisement -

या घाटाव्यतिरिक्त माऊलींच्या पादुकांना नीरास्नान, उभं रिंगण, गोल रिंगण, धावबावी टेकडीच्या उतारावरून धावत येणारे वारकरी अशी असंख्य आकर्षण केंद्रं वारीच्या वाटेवर आहेत. स्वच्छतेची वारी, वृक्षदिंडी वगैरे हौशी संस्था-संघटनांचे उपक्रम असतातच. वारकर्‍यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणारे, त्यांची आरोग्य तपासणी करणारे वैष्णवांची सेवा करण्यासाठी आतुरलेले असतात. एवढंच कशाला, बंदोबस्तावर नेमलेले पोलीससुद्धा कधी-कधी वारकर्‍यांबरोबर फुगड्या खेळताना आणि भजन-कीर्तनात टाळ घेऊन उंच आवाजात गाताना तल्लीन झालेले दिसतात. डोळ्यांचं पारणं फेडणारा असाच हा वारीचा सोहळा असतो आणि वारकर्‍यांप्रमाणेच तिथं उपस्थित नसलेले भाविकसुद्धा त्याचा आनंद घेत असतात. दोन वर्षं डोळ्यात प्राण आणून अनेकांनी ज्या सोहळ्याची वाट पाहिली, तो अचानक दुर्लक्षित कसा झाला?

कोरोनाकाळात पालखी सोहळ्याला परवानगी मिळणार नाही, अशी बातमी जेव्हा पहिल्यांदा आली, तेव्हा उमटलेली प्रतिक्रिया आठवल्यास यंदा वारी अशी दुर्लक्षित राहणं आणि एकमेकांना दिलेली आव्हानं-प्रतिआव्हानं डोंगराएवढी मोठी ठरणं जरा चमत्कारिकच वाटतं. पण काहीही म्हणा… कुणाच्यातरी मागं धावत सुटलेली एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीची प्रतिनिधी, तिच्यामागे धावणारा कॅमेरामन आणि स्टुडिओतून तिला जोरजोरानं हाका मारणारा अँकर… हे दृश्य बघून वारकर्‍यांच्या मनातली विठुरायाच्या भेटीची ओढ अधिक तीव्रतेनं समजली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या