Saturday, July 27, 2024
Homeनगरतहसीलदारांच्या कार्यतत्परतेमुळे दिव्यांगाला तातडीने मिळाले रेशनकार्ड

तहसीलदारांच्या कार्यतत्परतेमुळे दिव्यांगाला तातडीने मिळाले रेशनकार्ड

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदारांच्या कार्य तत्परतेमुळे दिव्यांग व्यक्तीला झटपट रेशनकार्ड मिळाले असून आधार दिव्यांग संघटनेच्यावतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या कार्यतत्परेचे कौतुक केले.

- Advertisement -

रामकृष्णनगर (शिरसगाव) येथील रहिवासी संदीप गोपीनाथ गंभीरे हे दिव्यांग व्यक्ती रेशनकार्ड मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. पुरवठा विभागात गेल्यानंतर त्यांना आठ दहा दिवसांनी या असे सांगितले त्यामुळे निराश झालेले पायाने अधु असलेले दिव्यांग गंभीरे जड अंत:करणाने तहसील कार्यालयाचा जिना उतरत होता. त्याचवेळेस तहसीलदार प्रशांत पाटील कार्यालयात जाण्यासाठी जिना चढत होते.

एक दिव्यांग व्यक्ती जिना उतरताना त्यांनी पाहिले. या दिव्यांग व्यक्तीचे नक्कीच काहीतरी महत्त्वाचे काम असणार आहे, अशी शंका त्यांना आली. त्यांनी दोन पावले मागे घेत, त्या दिव्यांग व्यक्तीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यावेळी त्याला हे माहीत नव्हते की हेच तहसीलदार आहेत व यांच्या सहीनेच आपल्याला रेशनकार्ड मिळणार आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी चौकशी केल्यानंतर दिव्यांग व्यक्ती संदीप गंभींरे यांनी सांगितले की, रेशनकार्ड मिळावे याकरिता हेलापाटे मारत आहे.

त्यावेळी तहसीलदार पाटील यांनी गंभीरे यास हाताला धरुन मागे फिरविले अन् माझ्याबरोबर चल मी तुला रेशनकार्ड देतो, असे म्हणाले. या वाक्यामुळे गंभीरे यांना नवल वाटले की पुरवठा अधिकार्‍यांनी नाही म्हटले मग हे कोठून देणार? तहसीलदार पाटील यांनी गंभीरे यांना हाताला धरून पुरवठा विभागात नेले व तातडीने रेशनकार्ड तयार करण्याचा आदेश दिला. अन् काही वेळातच गंभीरे यांचे रेशनकार्ड तयार झाले.

तहसीलदार पाटील यांनी सही करून ते त्यांच्या हातात दिले. त्यावेळी संदीप गंभीरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ही आनंदाची बातमी गंभीरे यांनी आधार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण खडके यांना सांगितली, त्यांनीही संघटनेच्यावतीने तहसीलदार पाटील यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या