टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामसभेच्या आयोजनाची कोणतीही माहिती न देता व नियमानुसार सभेचा अजेंडा न देताच पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी परस्पर ग्रामसभेबाबत फलकावर माहिती प्रसिध्द करुन सदस्यांना आंधारात ठेवून ग्रामसभेचा फार्स केला असल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे व सदस्य पती मोहन रणनवरे यांनी केला आहे.
‘टाकळीभानच्या विशेष ग्रामसभेचा सदस्यांसह ग्रामस्थांना विसर’ या शिर्षकाखाली सार्वमतच्या रविवारच्या अंकात वृत्त प्रसिध्द होताच ग्रामपंचायत सदस्य खडबडून जागे झाले व सार्वमत प्रतिनिधीकडे धाव घेत ग्रामसभेबाबत आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. किंवा नियमानुसार अजेंडाही देण्यात आलेला नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काल 30 नोहेंबर रोजी अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याची सूचना ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लिहिण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक पत्रकार वार्तांकनासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे गेले होते. मात्र, नियोजित 10.30 ची वेळ उलटूनही दुपारी 12.30 पर्यंत ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे सार्वमतच्या रविवारच्या अंकात वरील शिर्षकाखाली वृत्त प्रसिध्द झाल्याने सदस्यांंची चांगलीच तारांबळ उडाली होती.
ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे, मोहन रणनवरे, ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय नाईक, भाऊसाहेब पटारे आदी सदस्यांनी सार्वमत प्रतिनिधीची प्रत्यक्ष भेट घेवून सांगितले की, ग्रामसभेबाबत सदस्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी परस्पर निर्णय घेत आहेत. मासिक सभेचाही कोरमआभावी सभा तहकूब करण्याची प्रथा रुढ करण्यात आलेली आहे. तहकूब सभेनंतर पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी एकत्र बसून सदस्यांना आंधारात ठेवून निर्णय घेत आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार अत्यंत मनमानी पध्दतीने सुरू आहे.
बैठकिबाबत सदस्यांशी चर्चा न करताच बहुतेक सदस्यांना दुसरे काम आसताना बैठकिचे आयोजन करून कोरम आभावी सभा तहकूब केली जाते. व तहकूब सभेला कोरमची अट नसल्याने दोन तीन दिवसांनंतर केवळ पदाधिकार्यांच्या उपस्थितीत निर्णय घेऊन सभेचे इतिवृत्त लिहिले जाते. मासिक बैठकिचा व ग्रामसभेचा पदाधिकार्यांकडून केवळ फार्स केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या सुरु असलेल्या कामकाजाबाबत या सदस्यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया यावेळी दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सतरा सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत 9 महिला सदस्या आहेत. सरपंच पदी महिला असूनही महिला सदस्यांची उपस्थिती नगन्य असते. बहुतांश सदस्य सुमारे दोन वर्षांपासून कामकाजात भाग घेत नसल्याचे सांगितले जाते. ग्रामसभेलाही यापेक्षा वेगळी परीस्थिती नसते. कामकाजात सदस्य भाग घेत नसले तरी सदस्यपद आबाधित ठेवण्यासाठी नेहमीच बैठकिला अनुपस्थित राहणार्या सदस्यांच्या बैठकिच्या उपस्थिपत्रकावर सह्या होत असतात हे विशेष :